पशुवैद्यकीय दवाखाने हे ग्रामीण भागातील पशुंच्या आरोग्यासाठी संजिवनी आहेत. ग्रामीण भागातील पशुंना यथायोग्य आरोग्यसेवा पुरविणे हे पशुसंवर्धन विभागाचे प्राधान्यक्रम कार्य आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने हे सक्षमरित्या व पूर्ण कार्यक्षमेतेने कार्यरत राहणे अत्यंत आवश्यक आहे. या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पशुवैद्यकीय दवाखान्याचे बळकटीकरण करण्यासाठी * पशुसंजीवनी अभियान* सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात आले.
हे अभियान राबविण्या पुर्वी पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरावस्था झाली होती. त्याचप्रमाणे पशुपालकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. साधारणपणे पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर/कर्मचारी हजर नसणे. आवश्यक साहित्य नसणे आदी तक्रारी येत होत्या. त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय दवाखान्यांची भौतिक अवस्था देखील चांगली नव्हती. दवाखाना परिसरात स्वच्छतेचा अभाव, गवत वाढलेले, भिंतींचा रंग फिकट झालेला व निर्लेखनायोग्य साहित्य पडून राहिलेल्या अवस्थेत पशुवैद्यकीय दवाखाने होते.
पशुवैद्यकीय दवाखान्यांना या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह विचार विनिमय करून *पशुसंजीवनी अभियान* सोलापूर जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला.
1 फेब्रुवारी 2022 पासून हे अभियान जाहीर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील 40 पशुवैद्यकीय दवाखान्यांनी यात सहभाग नोंदवत पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या सौंदर्यीकरणाच्या कामकाजास सुरूवात केली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील नागरिक व पशुपालकांना या अभियानात लोकसहभागासाठी आवाहन केले. आजतागायत 735600 एवढा निधी या कामासाठी खर्च झाला. त्याचबरोबर पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांनीही पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या सौंदर्यीकरण कामात स्वतःच्या पगारातून मोलाचा वाटा उचलला.
गावोगावचे पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या सौंदर्यीकरणाच्या कामास सुरुवात झाली. दवाखने स्वच्छ व सुंदर होऊ लागले. दवाखान्याच्या आवारातील वाढलेले गवत साफ करून त्याठिकाणी वृक्षारोपण करण्यात येवून आवारात हरीत पट्टा तयार होवू लागला. पुढे जाऊन पशुधन वृद्धीसाठी पशुपालकांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी दवाखान्यात पशुधन विषयक पुस्तकांची लायब्ररी सुरू करण्यात आली.
अशा प्रकारे उपक्रम राबविणारी सोलापूर जिल्हा परिषद ही राज्यात एकमेव जिल्हा परिषद असून हा उपक्रम पुढे जाऊन संपूर्ण राज्यास मार्गदर्शक ठरेल.
पुढे जाऊन या नाविन्यपूर्ण उपक्रमात कामे उत्तम होण्यासाठी सहभागी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये स्पर्धा घोषित करण्यात आली. यासाठी त्रिस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात येवून गुणांकन पद्धतीने तपासणी करण्यात आली.
याशिवाय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे हे वेळोवेळी प्रत्येक तालुक्यात फिरून सुरू असलेल्या कामांची पाहणी करून मार्गदर्शन करीत होते. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठका व व्हिडिओ कॉन्फरन्स घेवून सातत्याने आढावा घेतला.
त्रिस्तरीय समित्यांमध्ये तालुकास्तरीय समिती, जिल्हास्तरीय समिती आणि उच्चस्तरीय समिती अशी रचना करण्यात आली.
तालुकास्तरीय समिती मध्ये
1- गटविकास अधिकारी - अध्यक्ष
2- सहाय्यक गटविकास अधिकारी - सदस्य
3- कृषी अधिकारी पंचायत समिती- सदस्य
4- पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती - सदस्य सचिव.
जिल्हास्तरीय समिती मध्ये
1- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी - अध्यक्ष
2- जिल्हा कृषी विकास अधिकारी - सदस्य
3- सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालपसचि पंढरपूर - सदस्य
4- पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक) - सदस्य सचिव.
उच्चस्तरीय समिती मध्ये
1- मुख्य कार्यकारी अधिकारी - अध्यक्ष
2- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी - सदस्य
3- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी - सदस्य
4- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त - सदस्य
5- मुख्य लेखा व वित्त अधिकारी (व) - सदस्य
6- उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत - सदस्य
7- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी - सदस्य सचिव
तालुकास्तरीय समितीने स्पर्धेत भाग घेतलेल्या दवाखान्यांना भेट देऊन तपासणी करण्यात आली. गुणांकणानुसार दोन पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या नावांची जिल्हास्तरीय समितीस शिफारस करण्यात आली. जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समिती कडून आलेल्या अहवालानुसार सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांची तपासणी करून अहवाल उच्चस्तरीय समितीकडे पाठविला होता.
आज उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. यामध्ये स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
यामध्ये जिल्हास्तरावर श्रेणी 1 मधील प्रथम तीन क्रमांक व श्रेणी 2 मधील प्रथम तीन क्रमांक जाहीर करण्यात आले.
*श्रेणी 1*
1- मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 प्रथम क्रमांक.
2- माढा तालुक्यातील मोडनिंब पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 द्वितीय क्रमांक.
3- माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 तृतीय क्रमांक.
*श्रेणी 2*
1- उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 प्रथम क्रमांक.
2- माळशिरस तालुक्यातील कोळेगाव पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 द्वितीय क्रमांक
3- मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 तृतीय क्रमांक.
त्याचबरोबर तुलनात्मक काम पाहून "उत्कृष्ट कार्यासाठी" सात पशुवैद्यकीय दवाखान्याचे नाव जाहीर करण्यात आले यामध्ये.
1- उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा पशुवैद्यकीय दवाखाना.
2- बार्शी तालुक्यातील पानगाव पशुवैद्यकीय दवाखाना.
3- सांगोला तालुक्यातील कडलास पशुवैद्यकीय दवाखाना.
4- दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे पशुवैद्यकीय दवाखाना.
5- पंढरपूर तालुक्यातील खर्डी पशुवैद्यकीय दवाखाना.
6- करमाळा तालुक्यातील केम पशुवैद्यकीय दवाखाना.
7- अक्कलकोट तालुक्यातील वागदरी पशुवैद्यकीय दवाखाना.
सप्टेंबर महिन्यात या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने सहभागी होण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत वरील सर्व विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
चौकट
कार्यक्षेत्रातील दौऱ्यावेळी पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरावस्था पाहून व्यथित झालो होतो. परंतु आज पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपार कष्ट करून पशुसंजीवनी अभियानाचा पहिल्या टप्प्यात 40 पशुवैद्यकीय दवाखान्यांचे जे सौंदर्यीकरण केले आहे ते पाहून आनंद झाला. पशुसंवर्धन विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या पशुसंजीवनी अभियानामुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांनी कात टाकली आहे. अत्यंत कल्पकतेने सौंदर्यीकरणाचे काम झाले आहे. पहिल्या टप्प्यात 40 दवाखान्यांनी सहभाग घेतला होता. यापुढे जिल्ह्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखाने सहभागी होतील याचे नियोजन सुरू आहे.