चांदवड येथील कॉलेजरोड येथे गेल्या सहा दिवसांपासून पाण्याची मोठी व मेन पाईपलाईन फुटली आहे व लाखो लिटर पाणी वाया जात आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ऐ ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अाहिरे यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना आज दि. २४ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले.
चांदवड शहरातील कॉलेज रोड येथे मागील सहा दिवसांपासून पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे. या पाईपलाईन मधून पाण्याची मोठी धार लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे या रस्त्यात सर्वत्र पाणी - पाणी झालेले आहे व चिखल तयार झाला आहे. हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात रहदारी असते. या रस्त्यावरून नागरिकांची व विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. लोकांना या पाण्यातून वाट काढत चालावे लागत आहे.
उन्हाळ्यात चांदवड शहरात मोठ्या प्रमाणात दुष्काळ व पाणी टंचाई असते. नळांना एक ते दीड महिना पाणी येत नाही. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परंतु येथे गेल्या सहा दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांमध्ये संतप्तेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी अनेक वेळा तोंडी तक्रार देऊनही प्रशासनाने यावर कोणती कार्यवाही केलेली नाही. येथील पाईप लाईन फुटल्याची बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनात असूनही ते याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करत आहेत. अधिकारी व ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे ही पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मागील सहा दिवसांपासून 24 तास मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
निकृष्ट दर्जाचे कामे करून शासनाकडून वारंवार निधी कसा लाटायचा फक्त हेच अधिकाऱ्यांच्या निदर्शनात असते. अधिकारी व ठेकेदार संगनमताने कच्च्या दर्जाचे कामे करून फक्त निधी लाटण्याचे काम करतात. ज्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात या पाईपलाईनचे काम झाले आहे, त्या अधिकाऱ्यांची व ठेकेदारांची कसून चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. ही पाईपलाईन तत्काळ दुरुस्त करण्यात यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ऐ ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अाहिरे यांच्या वतीने आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीत प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा यावेळीे देण्यात आला.