लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना कोर्टाने आज मोठा दणका दिला आहे. सोलापूर जिल्हा न्यायालयाने श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

या निर्णयानंतर देशमुख यांच्यावतीनं उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे समजते. देशमुख यांच्यावर एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनंतर पोलिसांनी देशमुख याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अटकेपासून सुरक्षा मिळावी यासाठी श्रीकांत देशमुखनं सोलापूर जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.

आज जिल्हा न्यायालयात या अर्जावर न्यायालयानं निकाल दिला. न्यायालयानं सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून देशमुख याचा अटकपुर्व जमीन फेटाळला. 5 प्रमुख मुद्द्यांवर जामीन फेटाळण्यात आला आहे.आरोपी हा राजकीय पक्षाशी संबंधित असून पळून जाण्याची, पुरावे नष्ट करण्याची शक्यता असल्याचे युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आले.

न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला.

मात्र, उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी श्रीकांत देशमुख यांच्याकडे दोन दिवसाची संधी देण्यात आली आहे. 26 तारखेपर्यंत जर उच्च न्यायालयाचे आदेश न आणल्यास आरोपीला अटक होऊ शकते.

जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी ही माहिती दिली. दरम्यान देशमुख यांना येत्या 26 ऑगस्ट पर्यंत पोलिसांनी अटक करुन नये असे ही जिल्हा न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

आता या प्रकरणी श्रीकांत देशमुख याच्यावतीने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावले जाणार आहेत असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते.