सार्वजनिक नळ,फेरीवाले व करवाढीच्या प्रश्नासंबंधी मुख्यमंत्रयांबरोबर संयुक्त बैठक लावणार.- कॉ.नरसय्या आडम

सोलापूर:- सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी शहरातील सार्वजनिक नळ बंद करण्याचे आणि घरपट्टीत पाच टक्के करवाढ करण्याचे आदेश काढले आहेत,तसेच सोलापुरातील फेरीवाल्यांना महानगरपालिका आयुक्तांनी जाचक अटी लादल्या असून,या प्रश्नी चर्चा करून सर्व आदेश रद्द करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकारी यांच्या समवेत लवकरच संयुक्त बैठक लावणार असल्याचे निवेदन स्वीकार नंतर घोषणा केल्याची माहिती माजी आमदार कॉ.नरसय्या आडम यांनी दिली. 

सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सार्वजनिक नळ बंद करण्याचा व घरपट्टीत ५ टक्के कर वाढवण्याचा आदेश जारी केला आहे.या आदेशाविरुद्ध आणि फेरीवाल्यांवर लावण्यात आलेले भरमसाठ दंड वसूल न करता पूर्वीप्रमाणे दंड लावण्याची मागणी आणि इतर मागण्या घेऊन माजी आमदार कॉ.नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.याप्रसंगी आडम मास्तर बोलत होते.   

सार्वजनिक नळ बंद करणे,5 टक्के घरपट्टी वाढ करणे, अतिक्रमण प्रतिबंधन वाढीव जाचक दंड बाबत मा.आयुक्त तथा प्रशासक पी.शिवशंकर यांना सकाळी 10 वाजता दूरध्वनीवरून भेटण्यासाठी वेळ राखीव ठेवण्याची विनंती केली असता त्यांनी ते मान्य करून शिष्टमंडळास सांयकाळी 4 : 30 वाजता ची वेळ राखून ठेवले मात्र प्रत्यक्ष नागरिकांचा मोर्चा शिष्टमंडळद्वारे निवेदन देण्यासाठी आले असता आयुक्त आलेच नव्हते त्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शिष्टमंडळाने जागेवरच तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर मा.आयुक्त येऊन निवेदन स्वीकारले व सदर नागरी प्रश्नांसंबंधी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या समवेत बैठक लावण्याचे आश्वासन दिले.

पुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले,की महानगर पालिकेत तुघलकी कारभार सुरू असून मनपा आयुक्त गरीब व कष्टकरी जनतेविरुद्ध निर्णय घेत आहेत.सार्वजनिक नळावर झोपडपट्टीतील हजारो कुटुंब अवलंबून असून भविष्यात सार्वजनिक नळ बंद झाल्यास गरीब व कष्टकरी जनतेला खूप मोठ्या जलसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे.दोन तीन दिवसांत मनपा आयुक्तांनी योग्य निर्णय घेतला नाही तर मुंबई येथे मुख्यमंत्रयांसोबत संयुक्त बैठक घेऊन आदेश रद्द करण्यास भाग पाडू असा इशारा आडम मास्तर यांनी दिला.याप्रसंगी बोलताना फेरीवाल्यांबद्दल अतिशय महत्वाचे मुद्दे आडम मास्टर यांनी उपस्थित केले.ते म्हणाले फेरीवाल्याना पंतप्रधान स्वनिधी अंतर्गत कार्यान्वित असलेली कर्ज योजना अपयशी ठरली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ११८६४ लाभार्थ्यानी अर्ज केला,पण प्रत्यक्षात फक्त ५४७४ अर्ज मंजूर झाले असून अद्याप ६३९० लाभार्थी या कर्ज योजनेपासून वंचित आहेत.या आंदोलनाच्या माध्यमातून फेरीवाल्यांच्या पुढील मागण्या मांडण्यात आल्या....

१) फेरीवाला परवाना फी पाच हजार रुपये असून ती कमीत कमी एक हजार रुपये झाली पाहिजे 

२) दररोज आकारण्यात येणारी 50 रुपयांची दंडाची पावती पूर्वीप्रमाणे दहा रुपये करण्यात यावी.

३) फेरीवाला हॉकर्स झोनचे सर्वे करून झोन निश्चित करण्यात यावेत. 

४) महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून व तसेच पोलीस खात्याकडून होत असलेली कार्यवाही ताबडतोब थांबवावी.

५) सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून हातगाड्या आणि जप्त केले इतर साहित्यांवर 3000 ते 4000 रुपये दंड आकारले जाते,ते पूर्वीप्रमाणे 200 ते 250 रुपये आकारण्यात यावे. 

६) सोलापूर शहरातील फेरीवाला चार चाकी व रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करणाऱ्या लोकांना सर्वे करून ओळखपत्र देण्यात यावे

७)दंडाची कार्यवाही करत असताना शंभर रुपये बॉण्डची अट रद्द करावी. 

८) मंगळवार बाजारातील व्यापाऱ्यांची व्यवसाय करणारी जागा निश्चित करण्यात यावी.

याप्रसंगी कॉ. युसूफ मेजर,माजी नगरसेविका कामीनीताई आडम,नासीमा शेख,व्यंकटेश कोंगारी,मुरलीधर सुंचू यांची आक्रमक भाषणे झाली.याप्रसंगी सुनंदा बल्ला,शेवंता देशमुख,रंगप्पा मरेड्डी,खाजा करजगी,शंकर म्हेत्रे आणि इतर नेतेगण यांची प्रमुख उपस्थिती होती.या आंदोलनात सुमारे तीन हजार महिला व पुरुष सहभागी झाले होते.