उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विधी व न्याय विभागाच्या कॉमन मिनीमम प्रोग्रामअंतर्गत २२ ऑगष्ट रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ मंडळ, वाशिम यांच्या संयुक्तवतीने आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम यांच्या सहकार्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे “ ट्रॅफिक रुल्स ” या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, जिल्हा विधिज्ञ संघाचे सचिव अॅड. एस. एन. खराटे, अॅड. ए. पी. वानरे व प्रमुख वक्ते म्हणून सहाय्यक परिवहन अधिकारी सतिष इंगळे यांची उपस्थिती होती.इंगळे यांनी रस्त्यावरील देवदुत या विषयावर बोलतांना सांगीतले की, कोणत्याही प्रकारची मनात भिती न बाळगता रस्त्यावर घडलेल्या अपघातग्रस्तांना मदत करावी. अशाप्रकारे मदत करणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारची पोलीसांकडुन विचारपुस केली जाणार नाही. तसेच कोणतेही रुग्णालय खर्च मागणार नाही. याबाबत कायदेविषयक मार्गदर्शन केले. टेकवानी यांनी मोटार वाहन नियमांचे योग्य ते पालन करावे व अपघातग्रस्त लोकांना पोलीसांची भिती न बाळगता वेळेवर मदत करावी असे ते म्हणाले. श्रीमती सय्यद यांनी उपस्थितांना मोटार वाहन कायद्याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. श्री. वानरे यांनी वाहतुक नियमबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन व आभार सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मंदार टवलारकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ममता इंगोले, मोहीनी मोरे, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक एस. एन. भुरे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.