गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली गोगाव येथील जमीन अधिग्रहणाचा मुद्दा लवकरच सुटणार
पुढील महिन्यात राज्यपालांकडे बैठकीचे आयोजन
आमदार डॉ देवरावजी होळी यांनी घेतली मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट मार्ग काढण्याची केलेली विनंती
बैठक लावण्याबाबत महामहीम राज्यपालांना सुधीरभाऊंनी दिले पत्र
मंत्रालयीन स्तरावर असलेला सोशल इम्पॅक्ट असाइनमेंट (SIA ) चा प्रस्ताव मंजुर करण्याची मागणी
दिनांक २३ऑगस्ट २०२२
गडचिरोली:- दि 23 :- मागील ५-६ वर्षांपासून गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाचा अडपल्ली- गोगाव येथील जमीन अधिग्रहणाबाबतचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे वन ,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची मुंबई विधानभवनातील कक्षात भेट घेवून यावर तातडीने मार्ग काढण्याची विनंती केली असता याबाबत तात्काळ पुढील महिन्यात बैठक आयोजित करण्याबाबतचे विनंती पत्र मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी राज्यपालांना दिले. त्यामुळे आता लवकरच या जमीन हस्तांतरणाचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचा विश्वास आमदार डॉ देवरावजी होळी यांनी व्यक्त केला.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये सन २०११ मध्ये गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली . त्यासाठी अडपली- गोगाव येथील ६४.५० हे. आर. जमीन खरेदीसाठी आरक्षित करून अधिग्रहणाच्या प्रक्रियेसाठी सन २०१८ मध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण देखील करण्यात आले मात्र काही लोकांच्या जमिनीचे अधिग्रहण व हस्तांतरण अजुनपर्यंत झाले नाही. जमिनींचे अधिग्रहण लवकरात लवकर व्हावे याकरिता शासन स्तरावरून प्रयत्न झाले माञ निर्णय होवू शकला नाही. अखेर जमीन अधिग्रहण संदर्भामध्ये मंत्रालयीन स्तरावर सोशल इम्पॅक्ट असाइनमेंट (SIA )च्या मंजुरी करिता प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र त्या प्रस्तावावर अजूनपर्यंत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. परिणामी अंतिम टप्प्यात असणारी ही जमीन हस्तांतरण प्रक्रिया जिल्हाधिकारी यांचे कडून कोणत्याही सबळ कारणाशिवाय रद्द करण्यात आली व नवीन प्रक्रियेद्वारे जमीन अधिग्रहण करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत ही प्रक्रिया राबविता राबविता जिल्ह्यात ३ कुलगुरु व ३ जिल्हाधिकारी झाले मात्र अजूनपर्यंत या विद्यापीठाच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. SIA च्या माध्यमातून होणाऱ्या जमीन विक्रीस शेतकऱ्यांची मंजुरी असून त्यास कोणतीही अडचण नाही. सध्याच्या स्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाटाघाटी किंवा तडजोडीद्वारे आपली जमीन देण्यास नाहीत. पुन्हा नव्याने वाटाघाटी तडजोडी द्वारे जमीन खरेदी प्रक्रिया राबविल्यास त्यास अनेक अडचणी आहेत. त्यात आणखी कालावधी जाईल व ती पुन्हा रखडेल. त्यामुळे जी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे त्याच SIA च्या प्रक्रियेला मंजूरी देणे व जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया तातडीने पार पाडण्याची आवश्यकता असल्याबाबतचे पत्र आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी राज्याचे वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.