औरंगाबाद(अप्पासाहेब गोरे )

धावत्या वाहनांना आग लागण्याच्या घटना गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार घडत आहे. अशीच एक थरारक घटना औरंगाबाद पुणे महामार्गावर ढोरेगांवजवळ घडली. नाशिक वरुन हिंगोलीला निघालेल्या भरधाव बसनं पेट घेतला. या आगीत बस जळून खाक झाली. दैव बलवत्तर म्हणून बसमधील २५ प्रवासी थोडक्यात बचावले.

हिंगोली आगाराची निमआराम बस एम एच १४ बि टी ४८०५ नाशिक बसस्थानक येथून २५ प्रवासी घेऊन औरंगाबाद मार्गे हिंगोलीला जात होती. ढोरेगावापासून पुढे काही अंतरावर पेंडापुर फाट्यावर आल्यानंतर गाडीच्या इंजिन खाली धूर येत असल्याचे लोखंडे या चालकाच्या लक्षात आले. चालकाने बस थाबवून प्रवाशांना सामानासह खाली उतरून घेतले या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक चौरे, पोहे का अमीत पाटील, राहुल वडमारे, श्रीकांत बर्डे, रिजवान शेख, रवी लोदवाल,पदम जाधव, आदींनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना सुरक्षित स्थळी हालवले व अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

मध्यरात्री २ दोन वाजताची वेळ असल्याने लवकर मदत मिळाली नाही. वेळेत मदत न मिळाल्यानं बस जळून राख झाली. त्यानंतर एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती मिळताच गंगापूर आगारप्रमुख मनिष जवळीकर यांनी बस मधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसुन पाठवुन दिले.