डॉक्टर बनून पोलिसांनी पकडली नशेच्या गोळ्या विकणारी टोळी

औरंगाबाद;शहरात एनडीपीएस पथक स्थापन झाल्यापासून नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सराईत गुन्हेगार प्रचंड खबरदारी घेत चोरीछुपे हा अवैध धंदा करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पथकालाही आता नवनवीन शक्कल लढावी लागत आहे. २० ऑगस्टला घाटीत नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या कुख्यात गुन्हेगारांना एनडीपीएस पथकाने डॉक्टर बनून अटक केली.पथकातील अंमलदार सुरेश भिसे व महेश उगले यांनी घाटीतील ऑनड्यूटी सीएमओंचेअॅप्रॉन घालून या कारवाईला अंजाम दिला. शेख नय्यर शेख नईम (वय २२) आणि शेख रहीम शेख महेबूब (वय ५६, दोघे रा. आसिफा कॉलनी, टाऊन हॉल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यातील नय्यर हा नशेच्या गोळ्यांची विक्री करणारा सराईत आरोपी आहे. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले, घाटीतील मेडिसीन विभागाच्या पाठीमागे दर्गा भागात काही गुन्हेगार नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी येतात. नशेच्या गोळ्या घेणाऱ्यांनादेखील ही जागा सोयीची वाटते. पोलिसांना या भागात कारवाई करण्यात अडचणी येतील, असा समज

त्यांचा होता. 

दरम्यान, शनिवारी (दि. २०) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कुख्यात शेख नय्यर हा नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली. त्यावरून एनडीपीएस पथकाचे सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे, औषधी निरीक्षक जीवन जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक नसीम खान, अंमलदार विशाल सोनवणे, महेश उगले, धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे, प्राजक्ता वाघमारे, दत्ता दुभळकर यांनी सापळा रचला. अटकेतील आरोपींकडून ७६ गोळ्या मोबाइल, दुचाकी, असा एक लाख तीन हजार ४५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चौकट-वेशांतर करून ठेवली आरोपींवर नजर

हरेश्वर घुगे यांनी सांगितल्याप्रमाणे

दर्गा परिसरात पोलिस महेश उगले, सुरेश भिसे डॉक्टरांच्या वेशात फिरत होते. यावेळी त्यांनी संशयित नय्यरवर नजर ठेवली. तो दुचाकीने आल्याची खात्री पटताच दोघे बोलत बोलत त्याच्याजवळ गेले. यावेळी आजूबाजूला दबा धरून बसलेल्या सहकाऱ्यांना इशारा करताच त्यांनी झडप घालून दोघांनाही पकडले.

चौकट-८ दिवसांनी नय्यरचे लग्न.

शेख नय्यर रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याचे आठवीपर्यंत शिक्षण झालेले आहे. मात्र, तो अतिशय चाणाक्षपणे हा अवैध धंदा करतो. विशेष म्हणजे, तो स्वतः नशा करीत नाही. फेब्रुवारीत त्याच्याकडून ५०० गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या तेव्हा तो सहा महिने जेलमध्ये होता. महिनाभरापूर्वीच तो बाहेर आला होता. लगेचच त्याने पुन्हा गोळ्यांची विक्री सुरू केली होती. दरम्यान, आठ दिवसांवर लग्न आलेले असताना तो पुन्हा गजाआड झाला.