पातूर:  तालुक्यातील काही गावात अजूनही एसटी बस सुरू झालेली नसल्याने नागरिकांना नाईलाजाने खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. या वाहनांमध्ये कोंबून नेले जात असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन बस सेवा सुरू करावी अशी मागणी होत आहे. प्राप्त माहितीनुसार, सांगोळा, खेट्री, चतारी, तुलंगा बु., शिरपूर, चांगेफळ, सुकळी या गावात बस सेवा बंद आहे. त्यामुळे काळी पिवळी, ऑटो अशा वाहनांद्वारे प्रवास करावा लागत आहे. लोकांची गैरसोय होत असल्याने एसटीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बस सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. परंतु त्याकडे यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. सध्या निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन बससेवा सुरू करून नागरिकांना न्याय द्यावा, असेही म्हटले आहे.