बुलढाणा, :२१. जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिकेवर एक डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची घडना घडली आहे. आकस्मित सेवेसाठी असलेल्या १०८ रुग्णवाहिकेवरील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर ओमप्रकाश सूर्यवंशी हे एका गंभीर रुग्णाला घेण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा अचानक धावत्या रुग्णवाहिकेत मृत्यू झाला आहे.

 

मिळालेल्या महितीनुसार, डॉ. सूर्यवंशी यांना एका रुग्णाचा फोन आला. ते रुग्णवाहिका चालक यांना घेऊन रुग्णाच्या घरी जात असताना धावत्या रुग्णवाहिकेत त्यांची तब्येत अचानक बिघडली. तात्काळ रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान ठेऊन त्यांना खामगाव सामान्य रुग्णालयात आणले. पण तोपर्यंत डॉ.सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. ही माहिती सदर रुग्णवाहिका संचालन करणाऱ्या भारत विकास ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.

 

पण १२ तास उलटून गेल्यावरही संबंधित कंपनीचे जिल्ह्याचे प्रबंधक अजिंक्य लवंगे यांनी अजूनही याठिकाणी भेट न दिल्याने डॉ.ओमप्रकाश सूर्यवंशी यांचे नातेवाईक व १०८ रुग्णवाहिकेचे चालक व डॉक्टर्स यांनी संताप व्यक्त केला. जो पर्यंत भारत विकास ग्रुप कंपनीचे अधिकारी या ठिकाणी येणार नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. भारत विकास ग्रुप कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तणावाला डॉ. सूर्यवंशी बळी पडल्याचा आरोप यावेळी कर्मचारी करत होते. मात्र त्याची समजूत घालून त्यांना मृतदेह ताब्यात देण्यात आला.