नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्तस्वरुप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचा उद्देश तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकतांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरवून याद्वारे राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्याच्या दृष्टीने नियोजित महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे २५ ऑगष्ट २०२२ रोजी पासून जिल्हयात आगमन होत आहे.महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन व नवउद्योजकांना विविध फायदे मिळण्यासाठी ही यात्रा तीन टप्प्यात पुढीलप्रमाणे राहणार आहे. तालुकास्तरीय प्रचार-प्रसिध्दी व जनजागृती - जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात लोकसमूह एकत्रित होण्याच्या जागेवर प्रचार-प्रसार व नाविन्यपूर्ण संकल्पनाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी एक वाहन (मोबाईल व्हॅन) निश्चित केलेल्या ठिकाणी येत आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा - तालुकास्तरावरुन नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांची सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वोत्तम संकल्पना सादर करण्याऱ्यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धा व विजेत्यांची घोषणा प्रत्येक सादरीकरण सत्रातील उत्तम १० संकल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण तज्ञ समितीसमोर करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विजेत्यांना १ लक्ष रुपयाचे रोख अनुदान तसेच आवश्यक पाठबळही पुरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेच्या स्पर्धेत सहभाग नोंदवण्याची कार्यपध्दती- मुख्यमंत्री यांचे हस्ते या यात्रेचा शुभारंभ १५ ऑगष्ट २०२२ रोजी करण्यात आला आहे. नवउद्योजकांना www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या संकेतस्थळाला भेट देवून या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करता येईल.याशिवाय जिल्हयात प्रत्येक तालुक्यात पुढील दिनांकांस फिरते वाहन (मोबाईल व्हॅन) द्वारे प्रचार-प्रसिध्दी दरम्यान नवउद्योजकांना सविस्तर माहिती मिळवून नोंदणी करता येईल. २५ ऑगष्ट रोजी मानोरा येथील आय.टी.आय., मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय येथे, २७ ऑगष्ट रोजी कारंजा येथील आय.टी.आय., के.एन. महाविद्यालय, विद्याभारती महाविद्यालय येथे तर मंगरुळपीर येथील आय.टी.आय., वसंतराव नाईक वरिष्ठ महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण वरिष्ठ महाविद्यालय येथे, २ सप्टेंबर रोजी रिसोड येथील आय.टी.आय., बाबासाहेब धाबेकर वरिष्ठ हाविद्यालय, विद्याभारती, भारत वरीष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे आणि ३ सप्टेंबर रोजी मालेगांव येथील आय.टी.आय., कृषी महाविद्यालय, आमखेडा, रामराव झनक वरिष्ठ महाविद्यालय येथे व वाशिम येथील आय.टी.आय., राजस्थान महाविद्यालय, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय येथे उपलब्ध असणार आहे.जिल्हयातील जास्तीत जास्त नवउद्योजकांनी या महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेत सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हयाचे प्रभारी जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी केले आहे. काही अडचणी असल्यास किंवा अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील संजय राऊत (9420106747), दिपक भोळसे (9764794037), अतिष घूगे (9850983335) यांना संपर्क साधावा. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.