मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून मतदारांनी या प्रक्रीयेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी हडपसर विधानसभा मतदार संघ यांनी केले आहे.
आधार जोडणीसाठी आवश्यक नमुना अर्ज क्र. ६ ब भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी ईआरओ नेट, गरुड,एनव्हीएसपी व वोटर हेल्पलाईन मोबाईल ॲप या माध्यमांवरदेखील उपलब्ध असेल. त्याचबरोबर मतदारसंघात छापील नमुना अर्ज क्र ६ ब च्या छापील प्रतींचे वाटप करण्यात येणार आहे. आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्या वतीने ऐच्छिक असून त्याचा तपशील गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
मतदारांनी मतदार ओळखपत्र व आधार क्रमांक यांची जोडणी करुन सहकार्य करावे. ही प्रक्रीया सुलभ आणि सहज असल्याने अधिकाधिक मतदारांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, २१३ हडपसर विधानसभा मतदार संघ यांनी केले आहे.