ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर विरघट यांनी १० ते ११ ऑगस्टच्या रात्री आत्महत्या केली. त्यांच्या सुसाईड नोट नुसार अकोट फैल पोलिसांनी ८ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले आहेत. प्रिंटिंग प्रेसमध्ये फसगत केली व विश्वासघाताने आर्थिक अडचणीत आणले. त्यांना शिक्षा व्हावी, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे.

प्रभाकर गंगाराव विरघट हे पत्रकार होते. मुलगा प्रतुल व वडील असे दोघे जण राहत होते. घटनेच्या दिवशी मुलगा प्रतुल काकाकडे रात्री झोपण्यासाठी गेला असता त्याच रात्री त्यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केली.११ ऑगस्ट रोजी सकाळी शेजारीच राहणारा दुसरा मुलगा अखिल याने वडिलांना चहा नाश्तासाठी फोन केला असता प्रतिसाद न मिळाल्याने येऊन पाहिले असता गळफास घेतलेल्या अवस्थेत वडिल दिसून आले.यानंतर अकोट फैल पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान प्रभाकर विरघट यांच्या खिशामध्ये तीन चिठ्ठया दिसून आल्या. त्यामध्ये शिवशक्ती प्रिंटिंग प्रेस व्यवहार १९८८ मध्ये रमेश सरने, मोहन काजळे, मदन जोशी, प्रभाकर जोशी, रमेश गायकवाड, रमेश जैन, प्रेम कनोजिया, मोतीलालजी कनोजिया यांनी फसगत केली. विश्वासघात केला आर्थिक अडचणीत ठेवले, गुन्हेगार केले म्हणून आत्महत्या करित आहे, असे नमूद केले आहे.

सुसाईड नोटमध्ये काय?

प्रभाकर विरघट यांच्या खिशामध्ये तीन सुसाईड नोटमध्ये नमूद आहे की, मुख्यमंत्री शिंदे सरकारने मला मरणोपरांत न्याय द्यावा, ८ जणांनी आपला विश्वासघात केला म्हणून आत्महत्या करीत आहे. सर्वांवर कारवाई व्हावी. प्रेस कामगार सुशीर वरघट (रा. ख्रिश्चन कॉलनी) याच्याकडून माहिती घ्यावी, प्रेसमध्ये आंबेडकरी चळवळीतील कोण कोण होते.

तिसऱ्या चिठ्ठीवर लिहिले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यापक चौकशीसाठी विशेष चौकशी अधिकारी नियुक्त करून सर्व आर्थिक जमानत दारांवर कारवाई करावी. या सर्वांनी सहकार्य केले नाही, मात्र गुन्हेगार केले. हा अन्याय झाला म्हणून न्याय द्यावा, असेही नमूद केले आहे.