पुणे नगर महामार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरच्या धडकेत इको कार वाहनातील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.या अपघातात संजय भाऊसाहेब म्हस्के(वय.५३), राम भाऊसाहेब म्हस्के(वय.४५), राजू राम म्हस्के(वय.७वर्षे), हर्षदा राम म्हस्के (वय.४ वर्षे), विशाल संजय म्हस्के(वय.१६वर्षे) असे मयत झालेल्या व्यक्तींची नावे असून साधना राम म्हस्के (वय.३५) या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या अपघातातील सर्व जखमी हे आवाने बुद्रुक (ता.शेवगाव, जि.अहमदनगर) येथील रहिवासी आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आज बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुणे नगर महामार्गावरून म्हस्के कुटुंब हे पुणे बाजूकडे जात होते.

त्याचवेळी समोरून चुकीच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनर(एच आर.३७ ई ७७८९) ची इको कार (एम एच.४६ ए. एच.००६३या वाहनाला जोरदार धडक बसली. अपघातानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

त्यातील गंभीर इजा झालेल्या चालक संजय म्हस्के, राम म्हस्के, राजू म्हस्के, हर्षदा म्हस्के, विशाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर साधना म्हस्के यांना गंभीर दुखापत असल्याने उपचार सुरु आहेत.

या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की इको कार वाहनाचा यात अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस करत आहेत.

दरम्यान अपघाताची माहिती मिळाल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांसह संपूर्ण अंमलदार यांनी रात्रभर जागे राहून सर्व कामकाज पार पडले. जखमींना मदत मिळेल याची दक्षता घेतली.