शिरुर दिनांक ( वार्ताहर ) म्हाडाच्या माध्यमातून शिरुर शहरात गृहनिर्माण प्रकल्पाद्वारे दर्जेदार घरे बांधून शिरुर शहराच्या वैभवात भर घालण्यात येणार असल्याचे म्हाडा गृहनिर्माण पुणेचे सभापती व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले . पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरूर शहरात अत्यल्प उत्पन्न गटांसाठी कमी किमंतीत सदनिका उपलब्ध होणार असून याबाबतची माहिती सर्वसामान्यांना सहजपणे उपलब्ध व्हावी याकरता शिरूर नगरपरिषदेची जुनी इमारत येथे पुणे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते यासाठीच्या सुविधा केंद्राचे उद्घाटन संपन्न होणार आहे. यावेळी म्हाडाचे मुख्य आधिकारी अशोक पाटील , कार्यकारी अभियंता प्रकाश वाबळे , गटविकास आधिकारी महेश डोके , नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे , उपअभियंता शुभांगी पतंगे , कनिष्ठ अभियंता पूजा ढमढेरे , सहाय्यक अभियंता प्रफूल्ल लोखंडे , सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी राहुल नवले , माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण , शिवसेनेचे जिल्हाचे नेते अनिल काशीद , बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे , माजी सभापती संतोष शितोळे , शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात , राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार , तर्डोबावाडीचे सरपंच जगदीश पाचर्णे , माजी नगरसेवक विठ्ठल पवार , माजी सभापती जयवंत साळूंखे आदी यावेळी उपस्थित होते . आढळराव यावेळी म्हणाले की पुणे जिल्ह्यातील शिरुर ही महत्वाची बाजारपेठ असून दोन जिल्ह्याचा सीमेवरती शिरुर शहर आहे . शिरुरची लोकसंख्या वाढत असून परिसरात ओद्योगिककरणाचा वेग ही वाढलेला आहे नागरिकांना चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून शासन कटिबध्द आहे . आगामी काळात शिरुर शहरातील पुणे नगर बायपास रस्त्यावर फार्मसी कॉलेजच्या म्हाडाचा जागेत ४०० ते ५०० घरे बांधून शिरुर शहराचा वैभवात भर घालणार असल्याचे आढळराव म्हणाले . शिरूर शहरात पुणे-नगर हायवे लगत शिरूर बस स्थानकापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ७० सदनिका व ८ गाळे असलेल्या प्रकल्पाचे काम पुणे म्हाडाच्या माध्यमातून लवकरच पूर्णत्वास येणार आहे. या घरांबाबत आवश्यक प्रक्रियेची तसेच प्रधानमंत्री आवास योजनेबाबतची माहिती सर्वसामान्यांना सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी याकरता पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे नागरिकांसाठी माहिती केंद्राची स्थापना करावी असे आदेश म्हाडा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार म्हाडा प्रशासनाकडून माहिती केंद्राची स्थापना करण्यात आली असून सदर प्रकल्पास मुख्याधिकारी शिरुर नगरपरिषद यांची सुधारित मान्यता प्राप्त होऊन प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत 60 टक्के काम पूर्ण झालेला हा प्रकल्प डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे पुणे म्हाडाचे नियोजन आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूरी प्राप्त अत्यल्प उत्पन्न गट सदनिकांची विक्री करिता उपलब्ध असुन चटई क्षेत्रफळ ३३०.०० चौ. फुट, बांधकाम क्षेत्रफळ ४२७ ते ४३५ चौ. फुट आहे. तसेच या सदनिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान प्राप्त होऊन त्याचा लाभ सदनिका धारकांना होणार आहे. सदर प्रकल्पास मुबलक पार्किंग सुविधा, सौर उर्जेवरील दिवे, अत्याधुनिक सोयी सुविधेनसोबतच योजने लगत शाळा, बँक, हॉस्पीटलची व्यवस्था असल्याने रहिवासीयांना त्याचा चांगला लाभ होणार असल्याचे म्हाडाचा वतीने सांगण्यात आले .