शिरुर दिनांक ( वार्ताहर ) पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरूर शहरात अत्यल्प उत्पन्न गटांसाठी कमी किमंतीत सदनिका उपलब्ध होणार असून याबाबतची माहिती सर्वसामान्यांना सहजपणे उपलब्ध व्हावी याकरता १६ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता शिरूर नगरपरिषदेची जुनी इमारत येथे पुणे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव पाटील यांच्या शुभहस्ते यासाठीच्या सुविधा केंद्राचे उद्घाटन संपन्न होणार आहे. शिरूर शहरात पुणे-नगर हायवे लगत शिरूर बस स्थानकापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ७० सदनिका व ८ गाळे असलेल्या प्रकल्पाचे काम पुणे म्हाडाच्या माध्यमातून लवकरच पूर्णत्वास येणार आहे. या घरांबाबत आवश्यक प्रक्रियेची तसेच प्रधानमंत्री आवास योजनेबाबतची माहिती सर्वसामान्यांना सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी याकरता पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे नागरिकांसाठी माहिती केंद्राची स्थापना करावी असे आदेश म्हाडा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार म्हाडा प्रशासनाकडून माहिती केंद्राची स्थापना होत असून त्याचा शुभारंभ शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. सदर प्रकल्पास मुख्याधिकारी शिरुर नगरपरिषद यांची सुधारित मान्यता प्राप्त होऊन प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत 60 टक्के काम पूर्ण झालेला हा प्रकल्प डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे पुणे म्हाडाचे नियोजन आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूरी प्राप्त अत्यल्प उत्पन्न गट सदनिकांची विक्री करिता उपलब्ध असुन चटई क्षेत्रफळ ३३०.०० चौ. फुट, बांधकाम क्षेत्रफळ ४२७ ते ४३५ चौ. फुट आहे. तसेच या सदनिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान प्राप्त होऊन त्याचा लाभ सदनिका धारकांना होणार आहे. सदर प्रकल्पास मुबलक पार्किंग सुविधा, सौर उर्जेवरील दिवे, अत्याधुनिक सोयी सुविधेनसोबतच योजने लगत शाळा, बँक, हॉस्पीटलची व्यवस्था असल्याने रहिवासीयांना त्याचा चांगला लाभ होणार असल्याचे आढळराव यांनी सांगितले .