शिरुर दिनांक ( वार्ताहर ) आनंद नागरी सहकरी पतसंस्थेत अपहार, अफरातफर गैरव्यवहार केलेली रक्कम मोठी असल्याने सदरच्या गुन्ह्यात ठेवीदाराना न्याय मिळणेसाठी सदरची केस आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग व्हावी व ठेवीदारांच्या रक्कमेचे संरक्षण व्हावे त्याच बरोबर सदरचे एफ.आय.आर. मध्ये ठेवीदारांच्या हितासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (MPID Act) लावावा व वगळण्यात आलेले सर्व संचालक मंडळ तसेच त्या कालावधी कार्यरत असणारे सर्व कर्मचारी यांचेवर एफ.आय.आर. दाखल व्हावी अशी मागणी पतसंस्थेचा ठेवीदारांचा वतीने शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . शिरुर शहरासह तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील  लोक आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद व ठेवीदार आहेत .१६ कोटी ७० लाख ५४ हजार ३६१ रु . रक्कमेचा अपहार करून ठेवीदारांचा विश्वासघात केल्याप्रकरणी आनंद नागरी पतसंस्थेचे अभयकुमार चोरडिया यांचासह व्यवस्थापक व अन्य अश्या 14 लोकांचे विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी संजयकुमार सखाराम पुंडे , वय 56 वर्ष, व्यवसाय शासकीय नोकरी राहणार पुणे यांनी फिर्याद दिली आहे .

याबाबत  ठेवीदारांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यासंदर्भातील एफ.आय.आर. दाखल करताना संस्थेतील ठेवीदारांची आर्थिक नुकसानीची रक्कम रुपये १६,७०,५४,३६१/- अशी दर्शविलेली आहे. ही एफ.आय.आर. दाखल करताना प्रशासकीय विशेष अहवालातील पान क्रमांक १९ मध्ये येणे बाकी मुद्दल रुपये १६,१५,२६,६५५/-अधिक व्याज रक्कम रुपये ८,९२,६९,३५०/- व बेकायदेशीर वसुलपात्र सुट रुपये ५५,२७,७०६/- अशी एकुण रुपये २५,६३,२३,७११/- अशी सदरच्या अहवालाच्या शेवटच्या पानात नमुद करण्यात आलेली आहे. परंतु एफ.आय. आर. मध्ये जाणीवपूर्वक रक्कम रुपये ८,९२,६९,३५०/- (रक्कम रुपये आठ कोटी ब्यानौ लाख एकोणसत्तर हजार तिनशे पन्नास) इतकी रक्कम कमी दर्शवुन चुकीच्या रकमेची म्हणजेच मुद्दल रुपये १६,१५,२६,६५५/- एवढ्याच रकमेची एफ.आय.आर. दाखल केलेली असुन सदरची एफ.आय.आर. संपूर्ण रक्कमेची दाखल होणे गरजेचे आहे. तसेच शिरुर पोलीस स्टेशनने सदरची एफ.आय.आर. दाखल करताना भारतीय दंड संहिता १८६ चे कलम ४२०, ४०९ व ३४ एवढीच कलमे लावलेली आहेत. वास्तविक अफरातफरी रक्कम ही फार मोठी असतांना पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या हितासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (MPID Act) मधील कलम २, ३ व ४ लावणे आवश्यक होते .परंतु तशी लावलेली नाहीत, यामुळे ठेवीदार अन्याय झालेला असुन ठेवीदारांची ठेवीची रक्कम मिळणे शक्य होणार नाही. तरी सदर कलमे वाढवावीत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहेत . आरोपीनी शिरुर पोलीस स्टेशनकडुन भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४१ अन्वये ठेवीदारांची रक्कम गोळा करुन देणेसाठी या कारणाने सवलत घेतलेली असून सदरचे आरोपी हे ठेवीदारांची रक्कम परत करणेऎवजी दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन पतसंस्थेतील ठेवीदारांची रक्कम बुडविण्याच्या दृष्टीने न्यायालयातुन अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या तयारीत आहेत, असे झाल्यास पतसंस्थेतील सर्व ठेवीदारांचे आयुष्य उध्वस्त होणार असल्याने व त्यातुन अनेक गंभीर बाबी निर्माण होणार असल्याने सदरचे आरोपींना लवकरात लवकर अटक होवुन त्यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई चालु करावी अशी मागणी ही करण्यात आली आहे . यावेळी ॲड . सुभाष जैन , रामदास सरड , देवल शहा , राजेश शिंगवी , निर्मला चाबुकस्वार , धनंजय धुमाळ , जयेश खांडरे , दिलिप मैड , नीलेश मुथ्था , शिवाजी चव्हाण , वसंत क्षीरसागर , योगेश संघवी , यांच्यासह ठेवीदार सहभागी होते . आमच्या हक्कांचे पैसे मिळालेच पाहीजेत , दोषींवर कारवाई झाली पाहीजे अशी जोरदार मागणी यावेळी ठेवीदारांनी केली .