बोगस व्यसनमुक्ती केंद्रावर आरोग्य पथकाची धाड़
डॉ.कुंबेफळकर पोलिसांच्या ताब्यात; व्यसनमुक्तीच्या नावावर रुग्णांची होत होती लुट
माजलगाव :- शहरा लगत भाटवडगाव येथील पिताजी नगरीत असणाऱ्या संकल्प व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रावर तहसीलच्या आदेशाने नेमलेल्या आरोग्य पथकाने गुरुवार दि. ११ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान धाड टाकली. यावेळी पथकाने संबंधित बोगस डॉ. संजय कुंबेफळकर वैद्यकीय पदवी, परवाना नसूनही रुग्णांवर उपचार करत असताना रंगेहात पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान ठग डॉक्टरांकडून गेल्या अनेक वर्षापासून गरीब रुग्णांची लूट केल्या जात असण्याची माहिती आहे. संकल्प व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून कुंबेफळकर गरीब रुग्णांची लूट करत असल्याची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत आरोग्य पथक नेमण्यात आले. या पथकाने गुरुवार दि. ११ रोजी सकाळी ११ वाजता पिताजी नगरी स्थित संकल्प व्यसनमुक्ती केंद्रावर धाड टाकली. पथकाने संबंधित उपचार केंद्र चालक कुंबेफळकर यांच्याकडे आरोग्य व्यवसायासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. यावेळी ठग डॉक्टरकडे वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, उपचार केंद्र चालवणारा परवाना, बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन एक्टनुसार असणारा परवाना मिळून आला नाही. तरी तो रुग्णांवर उपचार करत असल्याने त्याला पथकाने रंगेहात पकडले. दरम्यान पथका कडून केंद्राची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी एलोपॅसिक, आयव्ही फ्लूडस, इंजेक्टेबल, अँटिबायोटिक सीडेटिव्ह, टॅसिड, पेनकिलर औषधासह १६ रुग्ण उपचार घेत असल्याचे निदर्शनात आले. दरम्यान डॉ. दत्तात्रेय जगन्नाथ पारगावकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी ठग डॉ. संजय मनोहर कुंबेफळकर विरुद्ध भादवि कलम ४२०, ३३ सह वैद्यकीय व्यवसाय अधिनियम, औषध प्रसादने कायदा, अंतर्गत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेतला आहे. ही कार्यवाही तालुका वैद्यकीय अधिकारी मधुकर घुबडे, डॉ. दत्तात्रय पारगावकर, नायब तहसीलदार अशोक भंडारे, आरोग्य विस्तार अधिकारी शेषनारायण हटवटे यांनी पार पाडली.
चौकट :-
व्यसनमुक्ती केंद्रात केल्या जाणाऱ्या आघोरी उपायात पोलिसाच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याचा आरोप:-
बोगस संकल्प व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होणाऱ्या रुग्णांवर आघोरी उपाय केले जातात. दोन महिन्यापूर्वी शहर पोलीस ठाण्याचे ट्रैफिक पोलीस अनवने बाळासाहेब यांचे मेहुणे सतीश आश्रुबा केसकर (३२) राहणार नेकनूर यांना दारू व्यसन सोडण्यासाठी व्यसनकेंद्रात दाखल करण्यात आले होते. व्यसन सोडण्यासाठी रुग्णावर या ठिकाणी आघोरी उपाय केल्याचा आरोप अनवने यांनी केला आहे. रुग्णाला बांधून ठेवणे, मारहाण करणे इत्यादी प्रकार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी शहर पोलिसात आकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकाराला वाचा फोडण्यासाठी पोलीस कर्मचारी अनवने कोर्टात दाद मागून बोगस डॉक्टर संजय कुंबेफळकर यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत. सदरील प्रकरणामुळे संकल्प व्यसनमुक्ती केंद्रात घडलेल्या अनेक प्रकारांना वाचा फुटणार असल्याची चर्चा आहे.