शिरुर दिनांक ( वार्ताहर ) स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा ४.० अंतर्गत शहरातील निर्माण प्लाझा, मारुती आळी, हलवाई चौक या ठिकाणी सिंगल युज प्लास्टिक बंदी मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करणेत आली आहे .ही मोहिम मुख्याधिकारी स्मिता काळे यांचा मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली . यासंदर्भात पालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार केंद्र शासनाच्या पर्यावरण वन व हवामान परिवर्तन मंत्रालयाद्वारे पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८० ला अनुसरून प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६, अधिसूचीत करण्यात आले आहेत. यामधील प्रथम सुधारणा नियम, दिनांक १२/०८/२०२१ अन्वये सन २०२२ पर्यंत सिंगल यूज प्लॅस्टिक वस्तूंना प्रतिबंधित करण्याकरिता ३० सप्टेंबर, २०२१ पासून ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या आणि ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅगवर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र विघटनशील अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा, २००६ ला अनुसरून महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक,हाताळणी, साठवणूक ) निगमन अधिसूचना दि. २३/०३/२०१८, दि. ११/०४/२०१८, दि. ३०/०६/२०१८ या तरतुदी अन्वये राज्यात विविध प्रकाराच्या प्लास्टिक वापरावर बंदी लागू करण्यात आली आहे. उपरोक्त नियम व अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी शहरांमध्ये सुरु करण्यात आली आहे. यातील तरतुदीचे उल्लंघन झाल्यास प्रथम गुन्हा– उल्लंघन दंडात्मक कार्यवाही ५०००/- रुपये, दूसरा गुन्हा – उल्लंघन १००००/- रुपये, तिसरा गुन्हा -उल्लंघन २५०००/- रुपये आणि ३ महिन्यांचा तुरुंगवास अशी कारवाई करणेत येईल, तरी प्लास्टिक, थर्मोकोल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री हाताळणी करण्यात येऊ नये असे आवाहन मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी विक्रेत्यांना केले आहे. सदरच्या प्लॅस्टिक बंदी मोहिमे करिता शिरूर नगरपरिषदेचे स्वच्छ व पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे, आरोग्य लिपिक कदम, शहर समन्वयक प्राची वाखारे, प्रभारी मुकादम मनोज अहिरे व श्री. जाधव तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते. शिरूर नगरपरिषदेच्या वतीने शिरूर शहरात उघड्यावर कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करणेत येत आहे. शिरूर नगरपरिषद हद्दीत सी. सी. टीव्ही कॅमेरे बसविणेत आले असून त्याद्वारे निरीक्षण करून उघड्यावरती कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणेत आली आहे. नागरिकांना उघड्यावर कचरा न टाकण्याचे आवाहन मुख्याधिकारी काळे यांनी केले आहे.