परभणी शहरातील राजेसंभाजी मित्र मंडळाच्या वतीने माखन चोर दहीहंडी फोड स्पर्धा 2022 चे आयोजन दि. 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी सिनेतारका प्राजक्ता माळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती राजे संभाजी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष खासदार संजय जाधव यांनी दिली आहे. येथील राजे संभाजी मित्रमंडळाच्या वतीने मागील 17 वर्षांपासून सातत्य ठेवत माखन चोर दहीहंडी स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे परभणी जिल्ह्यासह राज्यभरातून नामांकित गोविंदा पथक या स्पर्धेला हजेरी लावत असतात. तसेच दहीहंडी स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी सिने कलावंतदेखील हजेरी लावतात. यावर्षी दहीहंडी स्पर्धेसाठी सिनेतारका प्राजक्ता माळी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक 1 लाख 1 हजार, द्वितीय 71 हजार तर तृतीय 51 हजार रुपये दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी डान्स महाराष्ट्र डान्स कार्यक्रमात असणारी प्रसिध्द ऑर्केस्ट्रॉ टीमदेखील बोलावण्यात आली आहे. भव्य एलईडी लाईटची व्यवस्था व साऊंड सिस्टिम लावण्यात येणार आहे. या स्पर्धेत परभणी जिल्ह्यामधून गोविंदा संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत पंचांचा निर्णय अंतीम राहणार असून गोविंदा संघाला किटमध्ये येणे बंधनकारक राहणार आहे. किटमध्ये न आलेल्या संघाला सहभाग घेता येणार नाही. स्पर्धेत भाग घेणार्या संघांनी वसमत रोडवरील खासदार संजय जाधव यांच्या संपर्क कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहेत. दरम्यान, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजे संभाजी मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.