रत्नागिरी:
दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ् इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्कार विभाग जिल्हा शाखा रत्नागिरी यांच्या विद्यमाने गुरुवार दिनांक ११.०४.२०२४ रोजी श्री.महालक्ष्मी माध्यमिक शिक्षण संस्था खेडशी ता.जि.रत्नागिरी येथे बौध्दाचार्य मार्गदर्शन मेळावा व बौद्धाचार्य सनद नुतनीकरण कार्यक्रम आद.विजय जाधव उपाध्यक्ष संस्कार विभाग प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रारंभी भगवान बुद्ध, बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले.तसेच पंचांग प्रणाम,त्रिसरणं पंचशील ग्रहण करून संपूर्ण सुत्रपठण घेण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक आद.विकास पवार सचिव संस्कार विभाग यांनी केले.
त्यानंतर संस्थेच्या केंद्रीय अभ्यास कमिटीच्या माध्यमातून बौद्धांच्या विधी संस्कारामध्ये आधुनिक काळाचा विचार करून विज्ञान व परिवर्तनावर आधारीत वेळोवेळी केलेले बदल.तसेच बौद्धाचार्याना विधी संस्कारामध्ये येणाऱ्या अडचणी या विषयी प्रमुख मार्गदर्शक आद.अनंत सावंत जिल्हाध्यक्ष,आद.एन.बी.कदम.महासचिव,आद.प्रदिप जाधव कोषाध्यक्ष व आद.अल्पेश सकपाळ सचिव संस्कार विभाग यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आद.विजय जाधव यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले की बौद्धाचार्य यांनी संस्थेच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे.आपण जनतेचे सेवक आहोत याची सदैव जाणीव ठेवावी.धम्माचे कार्य गतिमान करण्यासाठी तत्पर राहून संस्थेची २४ शिबीरे प्रत्येक गावागावात राबविण्याचा प्रयत्न करून धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. यावेळी बौद्धाचार्यांना दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ् इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय संरक्षक आद.मिराताई आंबेडकर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद.डाॅ.भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नावाचे सनद ओळखपत्र व गळ्यातील पट्टी देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आद.अल्पेश सकपाळ सचिव संस्कार विभाग यांनी केले.जिल्हयातील संस्थेचे १५० बौद्धाचार्य कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयु.संजय कांबळे प्रमुख संघटक,आयु.विजय कांबळे माजी कोषाध्यक्ष,आयु.विजय मोहिते कार्यालयीन सचिव,आयु.अल्पेश सकपाळ यांनी खुप मेहनत घेतली, तसेच सर्व तालुका शाखेचे पदाधिकारी, तालुका शाखा संस्कार विभागाचे पदाधिकारी यांनी उत्तम सहकार्य केले. शेवटी शरणत्तेय घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.