संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या बारवी धरणाने यंदा ठाणे जिल्ह्याला दिलासा दिला आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पहिल्यांदाच १५ ऑगस्ट च्या आधी हे धरण भरले आहे. ११ पैकी धरणाचे आठ स्वयंचलित दरवाजे उघडले आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण शंभर टक्के भरले असून गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान धरणाच्या अकरा दरवाजे पैकी आठ दरवाजे उघडले गेले आहेत. हे सर्व दरवाजे स्वयंचलित असल्यामुळे धरणात पाण्याचा साठा वाढल्यास या धरणाचे सर्वच्या सर्व अकरा दरवाजे उघडले जाणार आहेत. धरण भरल्याने आता धरणात ३३४ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरणातून ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण एमआयडीसी क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांना देखील पाणी पुरवठा केला जातो. गुरुवारी सकाळी धरणाच्या पाण्याची पातळी तपासली असता सकाळी धरण ९८ टक्के भरले होते आणि सायंकाळी पाच वाजता हे धरण भरून वाहू लागले. बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे बारावी व उल्हास नदीकिनारी असलेल्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.