गावात शासकीय टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येतो मग पाणी मुरते कुठे ?
"मुरमा येथे भिषण पाणीटंचाई; पंधरा दिवस उलटूनही गावात पाणी मिळेना;नागरिकांची पाण्यासाठी पायपीट"
पाचोड (विजय चिडे)गेल्या महिनाभरापासून पैठण तालुक्यातील मुरमा येथे पाणी नसल्याने गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. मात्र, या गोष्टीकडे सरपंच व ग्रामसेवकांचे सरासपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे, मुरमा येथे सोमवारी पासून गावांत शासकीय टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असतांनाही विहिरीमध्ये पाणी नाही असे सांगण्यात येत त्यामुळे दररोज १२ हजार लिटर पाणी शासकीय टॅंकरने पुरवठा करण्यात येतो मग ते पाणी मुरतेय कुठे ? अशा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
मुरमा ता.पैठण या गावाची दोन हजार च्या जवळपास लोकसंख्या असून सध्या गावात महीना भरापासुन पाणी नसल्याने येथील नागरिकांना आजूबाजूच्या शेतांमधून पायपीट करीत पाणी आणावे लागत. गावांमधील चार ही सरकारी विहिरी पाण्यावाचून कोरड्याठाक पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी कोसो दूर जावे लागत असल्याने शासनाकडून दोन टँकरने दररोज गावात बारा हजार लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, मात्र टँकर सुरू होऊन पाच दिवस उलटले तरी देखील गावांमध्ये एकही दिवस पाणी सोडण्यात आलं नसल्याने नागरिकांमध्ये सध्या नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या टँकरने येणारे पाणी नेमक मुरतेय कुठे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मुरम्यात दोंन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत कडून गावामध्ये लाखों रुपयांची जल जिवन ही योजना राबवण्यात आली तर या छोट्याश्या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल चार विहीर आहे. त्यामुधून लाखो रुपये खर्च करून पाईप लाईन करण्यात आले आहे.परंतु, त्या पाईप लाईन ला पाणी सोडले जात नसल्याने मुरम्यात पाण्याची टंचाई असल्याचे सरपंच व ग्रामसेवकांना दिसत नाही का? असा संतप्त प्रश्न नागरिक करत आहेत. गावाच्या जवळपास एक महिन्या पासून कुठेही पाणी नसल्याने तब्बल एक किलोमीटर वरून नागरीक पायपीट करून पाणी आणावे लागत असून फेब्रुवारी महीन्यापासुन गावात पाणी येत नाही तरी सरपंच, ग्रामसेवक ,उपसरपंच यांनी शासकीय टॅंकरसाठी प्रस्ताव पाठवून गावात टँकर सुरू करून घेतलेत, मात्र त्या टँकरचे पाणी अद्यापही गावात सोडण्यात येत नाही त्यामुळे गावकऱ्यांना पाणी दिसते पण घेता येणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी आता ग्रामपंचायतीने यापाणी टंचाईकडे लक्ष देउन गावात लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आता गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
चौकट-
पाण्यासाठी रोजंदारी बुडवावी लागत असून नागरिकांकडे दिवसभर पाण्याचाच विचार असतो: आम्हा महिलांना पाण्यासाठी शेत शिवारात पायपीट करीत जावे लागते. घरात पाणी नसल्याने कोणत्याच कामात चित्त लागत नाही. दिवसभर पाण्याचा च विचार असतो.पाण्यासाठी महिलांचे च जास्त हाल होत असतात. एवढी गंभीर समस्या निर्माण झालेली असताना आमची पाण्याची समस्या कोणीच सोडवत नाही.
अलका बंडू चिडे- ग्रामस्थ,मुरमा.
चौकट-
मुरमा येथे प्रभारी ग्रामसेविकांना दूरध्वनी वरून संपर्क केला असता, त्यांनी दूरध्वनी स्वीकारला नसल्याने त्यांची याबद्दल कुठली प्रतिक्रिया भेटू शकली नाही, तसेच त्या ग्रामपंचायत मध्ये उपस्थित राहत नसल्याने भेटी होऊ शकली नाही.