रत्नागिरी / प्रतिनिधी
तालुक्यातील बावनदी येथील बौद्धवाडीत माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ रोजी) कार्यक्रमात जाणूनबुजून व्यत्यय आणण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घडलेल्या प्रकाराबाबत खोटी तक्रार देणाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ग्रामीण पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली आहे.
विविध संघटनांच्या माध्यमातून जिल्हाभर त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते. याच पार्श्वभूमीवर निवळी येथील बौद्धवाडीत दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटेपासून लगबग सुरु होती. दरम्यान साऊंड सिस्टीम चालू असल्याची तक्रार फोनद्वारे पोलिसांकडे करण्यात आली. फोनद्वारे सांगितल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पावसकर यांनी बौद्धवाडीतील पदाधिकाऱ्याला सकाळी सहा वाजताच फोन करून रात्रभर वाडीत स्पीकर चालू आहे. त्या स्वरूपाची तक्रार आमच्याकडे आली आहे. सकाळी नऊ वाजता पोलीस स्थानकात या... असे संगितले.
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, बौद्धवाडीतील ग्रामस्थ सकाळी पोलीस ठाण्यात दाखल झाले. परंतु पोलिसांनी सकाळी येण्यास सांगितल्यामुळे निवळी बौध्दवाडीत जयंती उत्सव होऊ शकला नाही. या प्रकारातून ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले. यानंतर प्रत्यक्षात रात्रभर स्पीकर चालू नसल्याने चुकीची तक्रार किंवा माहिती देणाऱ्या इसमाला समोर बोलवून खोटी तक्रार दिली असल्याबाबत योग्य ती समज द्यावी व कारवाई करावी, अशी मागणी बौध्दवाडीतील ग्रामस्थांनी निवेदनातून केली.
संजय निवळकर यांनी दिली होती पोलिसांना माहिती
रात्रभर स्पीकर चालू असल्याची फोनद्वारे माहिती संजय निवळकर यांनी दिल्याचे पोलिसांनी ग्रामस्थांना सांगितले. यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार चुकीची माहिती देणाऱ्या निवळकर यांना अकरा दिवस उलटून ही पोलिस प्रशासनामार्फत योग्य समज दिली नसल्याने याउलट हे प्रकरण निकाली काढण्याचा किंवा मिटविण्याचा प्रयत्न बीट अंमलदार वाजे यांच्याकडून केला जात होता. मात्र ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक यांची भेट घेण्याचा आग्रह धरला. व हा विषय मिटविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. यापूर्वीही निवळकर याने वाडीतील लोकांना त्रास दिल्याचे प्रकार घडले आहेत असे ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले.
संबंधितावर योग्य कार्यवाही केली जाईल....
या प्रकरणासंदर्भात निवळीतील बौद्ध ग्रामस्थ रविवारी( दिनांक १८ फेब्रुवारी रोजी ) पोलीस स्थानकात दाखल झाले. संध्याकाळी चारच्या दरम्यान नूतन पोलीस निरीक्षक नितीन ढेरे हे पोलीस स्थानकात आल्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित निवळकर याच्या गावातील तक्रारीचा पाढाच वाचला. नागरिकांचा रोष पाहून पोलीस निरीक्षक ढेरे यांनी संबंधितावर योग्य कार्यवाही केली जाईल तसेच केलेली कार्यवाहीची माहिती ग्रामस्थांना दिली जाईल, असे पोलीस निरिक्षक ढेरे यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले आहे. यावेळी बौद्धवाडीतील अनेक ग्रामस्थ पोलीस स्थानकात उपस्थित होते.