रत्नागिरी /प्रतिनिधी

शहरात सोमवारी ५ फेब्रुवारी 2024 शिर्के उद्यान येथे विठ्ठलाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्यभरातील अनेक वारकरी दाखल झाले होते. तर दुसरीकडे शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असल्यामुळे रत्नागिर बाजारपेठ येथे जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ही उद्धव ठाकरे ज्या रस्त्यावरून येनार तो रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. या दौऱ्यादरम्यान पोलिसांचा भर उन्हात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांची चांगलीच दमछाक होताना दिसून येत होती. 

पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने पुतळ्यांच्या माध्यमातून का होईना विकासकामे करण्याचा धडाका सुरू आहे. रवीवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले त्यानंतर सोमवारी सायंकाळी विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त राज्यभरातील अनेक वारकरी रत्नागिरीत दाखल झाले. वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. तसेच रिंगण सोहळा ही पार पडला. मात्र, या कार्यक्रमामुळे माळ नाका ते जिल्हा परिषद या भागात मोठी वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुख्य रस्त्यावरील चौकांमध्ये वाहतूक पोलिसांकडून वाहतूक रोखून दिंडीला मार्गस्थ केले. प्रशासनाने मुख्य वाहतुकीचा रस्ता बंद केल्याने या भागात वाहतुकीचा खोळंबा होऊन त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागला. जवळपास दोन तास या भागातील वाहतूक कासव गतीने पूढे सरकत होती. परंतु राज्याचे उद्योगमंत्री, तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील गाड्या शासकिय विश्राम गृहाच्या बाहेरील रस्ता बंद करून अगदी शिस्तबद्ध पद्धतीने मुख्य रस्त्यावर पार्क करण्यात आल्या होत्या. यासोबत पोलिसांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा परिषद ते माळनाका परिसरात एका मार्गीकेने वाहतूक सुरू होती. मोठ्या गाड्यांसह लहान गाड्यांना मोठया वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यातून नागरीक , वाहनचालक त्रस्त झाले होते. 

आधीच कासव धिम्या गतीने सुरू असलेले काँक्रीटीकरणाचे काम त्यातच मंत्र्यांचे कार्यक्रमाच्या सोहळ्यासाठी रस्ता बंद करून वाहतूक एका मार्गिकेने वळवण्यात आली. ही विकासकामे करताना महिनोंमहिने नागरिकांना एकेरी वाहतूक, खोदकामाची धूळ-मातीचा त्रास सहन करावा लागतो. विकासकामांचा हा त्रास नागरिक सहन करत आहेत. मात्र, त्यात मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. याला जबाबदार कोण? मंत्र्यांनी नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयी बाबत विचार करणे गरजेचे असते. मात्र रत्नागिरीत मंत्री आपल्या दौऱ्यावेळी नागरिकांना, वाहनचालकांना वेठीस का धरतात? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांमधून विचारले जात आहे.