चिपळूण 

येथील काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मध्ये प्रवेश केला. या रिक्त झालेल्या पदावर अचानक खेडींतील काँग्रेसचे जुने पदाधिकारी सुधीर दाभोळकर यांची नियुक्ती प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्यामार्फत करण्यात आली. ही निवड होऊन काही तास होत नाहीत तोपर्यंत या निवडीला पक्षांतर्गत विरोध सुरू झाला असून, काहींनी पक्षाचा राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला आहे. पक्षांतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (२ फेब्रुवारी) मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले आहे. 

चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. विद्यमान आमदार अजित पवार यांच्यासोबत सक्रिय असल्याने शरद पवारांकडून संधी असल्याचे लक्षात घेत काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेश करताच त्यांना चिपळूण मतदार संघातून विधानसभेची उमेदवारीही जाहीर करण्यात आली. प्रशांत यादव यांच्या रिक्त झालेल्या चिपळूण काँग्रेस तालुकाध्यक्षपदी सुधीर दाभोळकर यांची निवड झाली.

 मात्र, या निवडीनंतर चिपळुणातील काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. सुधीर दाभोळकर यांच्या निवडीला काँग्रेस शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, महिला काँग्रेस शहराध्यक्ष श्रद्धा कदम व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजीद सरगुरोह यांच्यासह काँग्रेस महिला आघाडी व सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. ही निवड करताना किमान पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते; परंतु परस्पर निवड केल्याने ही निवड रद्द करावी, अशी मागणी केली जात आहे. तालुकाध्यक्ष पदाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी मुंबई येथे महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.