अलिबाग :भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौल येथे झालेल्या कोकण दौऱ्यातील रायगड जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच जनसंवाद सभेत खरपूस समाचार घेतला. तोडा, फोडा राज्य करा, अशी ज्याप्रमाणे इंग्रजांनी नीती वापरली तीच नीती सध्या भाजप देशात वापरत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. सध्या टीव्हीवर झळकणाऱ्या मोदी सरकारच्या जाहिरातबाजीवर कडाडत या योजनांचा लाभ नेमका कुणाला मिळाला आहे, २ कोटी तरुणांना रोजगार मिळाला का, असा सवाल भाजपला विचारला.
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी टीका करताना ज्यावेळी बाबरी पाडली त्यात शिवसैनिकच होते, असे सांगत राम मंदिराला विरोध नाही, परंतु राम मंदिराच्या नावावर भाजपने प्रसिद्धीचा दिखावा सुरू केला आहे. दोन कोटी तरुणांना रोजगार देणार, असे म्हणणाऱ्या मोदींनी किती जणांना रोजगार दिला याचा खुलासा करण्याचे थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले.
देवेंद्र फडणवीस पाव उपमुख्यमंत्री
राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे देवेंद्र फडणवीस यांना मात्र सध्या पावकोरप्रमाणे उपमुख्यमंत्रीपदाचा वाटा मिळाला आहे, अशी टीका करीत शिखर बँक घोटाळ्यातील आरोपी अजित पवारांना भाजपने चक्क क्लीन चिट दिली आहे, तर दूसरीकडे भाजपने ईडीला हाताशी धरून विरोधकांवर कारवायांचे सत्र सुरू केल्याचेही ठाकरे म्हणाले.