रत्नागिरी /प्रतिनिधी

राज्याचे उद्योगमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाचे शानदार लोकार्पण केले. मात्र पहिल्याच प्रयोगात प्रेक्षकांना आवाज व्यवस्थित येत नसल्याने साऊंड सिस्टीमचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नाट्यगृहातील पहिल्याच वातानुकूलित प्रयोग सुरू असताना गोंधळ निर्माण झाला. नाट्यगृहात "सागरा प्राण तळमळला" हा प्रयोग चालू होता. प्रयोगावेळी प्रेक्षकांना आवाज व्यवस्थित येत न्हवता. चालू असलेला प्रयोग काही काळ थांबवण्याची नामुष्की देखील आयोजकांवर ओढवली. यावेळी नाट्यगृहात प्रेक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पुन्हा प्रयोग चालू करण्यात आला. तरीही आवाज वाढविण्याची मागणी प्रेषकांमधून केली जात होती. अद्ययावत साऊंड सिस्टीम बसवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र पहिल्याच प्रयोगात आवाज धड येईना अन् प्रयोगाचा शेवट होईना अशी काहीशी अवस्था पाहायला मिळत होती. यावरून आता नाट्यगृहातील सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. 

विशेष म्हणजे या नाट्यगृहाचे लोकार्पण झाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांचासह मान्यवर मंडळी देखील सागरा प्राण तळमळला हा प्रयोग पाहण्यासाठी समोर बसलेले होते. पहिल्याच प्रयोगात तारांबळ उडाल्याने प्रेक्षकांमधून चांगलीच चर्चा रंगली होती. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी सात कोटी मंजूर झाले असून निर्माण ग्रूपच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. नाट्यगृहामध्ये स्टेज लाईट सुद्धा पूर्णपणे नवीन बसवण्यात आला आहे. खुर्च्या आणि स्टेजवरील पडदा, ट्रॅक, विंग नवीन बसवण्यात आले आहे. ग्रीन रूम आणि व्हीआयपी रूमचे रिनोवेशन करण्यात आले आहे. एकूणच नाट्यगृहाचे सर्व काम नव्याने होत असताना आवाज ही सूस्पष्ट येईल यात प्रश्नच नाही असे प्रेक्षकांना वाटले होते. मात्र प्रयोग पाहायला आलेल्या काही प्रेक्षकांचा साऊंड सिस्टीमवरून हिरमोड झाल्याचे दिसून आले.

ज्या साऊंड सिस्टीमवर सर्व काही अवलंबून असते ती साऊंड सिस्टीमची समस्याच नाट्यगृहातील दूर होऊ शकलेली नाही. यासोबत स्टेजवरील पडदा देखील हलक्या दर्जाचा वापरल्याचे बोलले जात आहे. प्रयोग चालू असताना स्टेजवरील पडदा वाऱ्याबरोबर हलत डुलत होता. हा सर्व प्रकार वातानुकूलित पहिल्याच प्रयोगात घडल्याने प्रेशकांसह राजकीय टीकाकारांनाही चांगलाच विषय हाती मिळाला. नाट्यगृहासाठी खर्च करण्यात येत असलेले दहा कोटी पाण्यात जातायत की काय ? असे एक ना अनेक प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.