रत्नागिरी /प्रतिनिधी
गेले दोन महिन्यांपासून मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे. परंतु हे काम संतगतीने सुरू असल्यामुळे याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. या भागातील रस्त्यावर प्रचंड मोठया प्रमाणात धुळ उसळत असल्यामुळे वाहनचालक, पादचारी तसेच दुकानदार हैराण झाले आहेत.
सुरुवातीला रेल्वे स्टेशनपासून ते गयाळवाडी दरम्यान अचानक रस्ता खोदण्यात आला. त्यानंतर पुढे कारवांचीवाडी ते खेडशीपर्यंत एक बाजू खोदाई केली. हातखंबा तिठ्यापर्यंत काही भाग खोदाई केला आहे. ज्या भागात खोदाई केली तेथील काँक्रीटीकरणाचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता ठेकेदाराने थेट हातखंबा तिठ्यांपर्यंत रस्ताची खोदाई केली. यातून सर्व्हिस रोडची पूर्णतः दुरावस्था झाली आहे. ठेकेदाराच्या नियोजाअभावी नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. रस्ता पूर्ण मातीने झाकून गेला आहे. अशा स्थितीत वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे काम प्रगतीपथावर सुरू असल्याचा केवळ दिखावा केला जात आहे. या क्षेत्रातील काम रवी इन्फ्रा प्रायव्हेट लि. कंपनी मार्फत करण्यात येत आहे. मीऱ्या ते हातखंबा भागातील काम लवकरच परिपूर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात सुरू असलेल्या या महामार्ग बांधणीच्या कामाचा वेग मंदावला आहे. चार दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनजवळ अंदाजे १०० मीटरपर्यंत काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. अन्य कोणत्याही भागात पक्के काँक्रीटीकरण लांबच मोऱ्यांचे सुरू असलेले काम पूर्ण झालेले नाही. तर कारवांचीवाडी भागात जेसीबीच्या साहाय्याने खोदाई करण्याचे काम अजूनही सुरू आहे. ठेकेदाराने ठिकठिकाणी खोदाई करून ठेवल्यामुळे धोकादायक महामार्गावर कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. मात्र याबाबत महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीही घेणे देणे नसल्याचे दिसून येत आहे.
रत्नागिरी ते हातखंबा या रस्त्यावर कायम वर्दळ असल्याने वाहनचालकांसह नागरिकांना सकाळ, दुपार, संध्याकाळ धुळीच्या समस्येने ग्रासले आहे. या मार्गावर छोटे-मोठे अपघात देखील होत असतात. मंदावलेल्या कामामुळे सर्व्हिस रोडची अक्षरशः चाळण झाली आहे. हातखंबा ते रत्नागिरी हा १३ किमीचा रस्ता पार करण्यासाठी पंधरा मिनिटा ऐवजी पाऊण तास लागत आहे. १३ किमीचे अंतर म्हणजे वाहन चालकांसाठी वेदना देणारे ठरत आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी या मार्गाने नेत असतांना तो रुग्णालयापर्यंत सुरक्षित पोहचेल किंवा नाही याबाबत शंकाच आहे. महामार्ग संबंधित सुरक्षिततेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते प्राधिकरण विभागाचे अधिकारी एसीच्या गाड्यांमधून फिरून नेमके कोणते निरीक्षण करतात. हाच सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
धुळीच्या त्रासाला नागरिक वैतागले
रस्त्याच्या बाजूला छोटी-मोठी हॉटेल्स, दुकाने असल्याने या धुळीचा त्रास येथील दुकानदारांना देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. हवेत मोठे धुळीचे लोट उसळतात. रस्त्यांवरील धुळीच्या त्रासाला वाहनचालकांसह रस्त्याच्या बाजूला राहणारे नागरिक वैतागले आहेत. घर, हॉटेल्स, दुकानांमध्ये धुळीचा थर साचलेला पाहायला मिळतो. यामुळे धुळीच्या त्रासाने वैतागलेल्या काही घरमालकांना आपल्या घराला ग्रीन कापड गुंडाळून घरच झाकून घेतले आहे.
पालकमंत्री महोदयांचे सुध्दा दुर्लक्ष
हातखंबा ते रत्नागिरी रस्त्यावर मोठे ट्रक आणि एसटी चालक भरधाव वेगाने वाहने चालवतात. या वाहनांमागून प्रचंड धुळीचे लोट उसळतात. धुळीतून पुढचा रस्ता दिसेना असा होतो. या धुळीमुळे सार्वजनिक वाहनांतून प्रवास करणारे प्रवाशी , खाजगी रिक्षातून दुचाकीवरून प्रवास करणार्या प्रवाशांना नाकी नऊ आले आहे. रस्त्यावरची वाहतूक अक्षरश: बेवारसपणे सुरू असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे याच मार्गाने पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह गाड्यांचा ताफा जात असतो. ते या सरकारमधील मंत्री सुध्दा आहेत. मात्र त्यांचेही या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रस्त्यावरील धूळ दुचाकीस्वारांच्या जीवावर
विशेषतः दुचाकीस्वारांचा या रस्त्यावरून जीव टांगणीला लागत आहे. या मार्गावरून प्रवास करणार्या सामान्य प्रवाशांचा मात्र नेहमीच्या धुळीने ‘भूत’ होत आहे. चांगल्या कपड्यांचा अवघ्या एका फेरीच्या प्रवासात नूर पालटत असल्याने या मार्गावर प्रवास करणारे कामगार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना हा प्रवास सध्या नकोसा झाला आहे.
काँक्रीटीकरणाच्या कामाला वेग आणण्याची मागणी
धुळीचे लोट उसळत असल्याने ठेकेदार कंपनीकडून दिवसातून एकदा रस्त्यावर पाणी मारले जाते. काही वेळेला तर पाणीच मारले जात नाही. पाणी मारल्यानंतर पाण्यावरून दुचाकीस्वार घसरून पडण्याची शक्यता दाट असते. परंतु कुचकामी ठरत असलेल्या उपाययोजना करून वाहनचालकांचा जीव धोक्यात टाकण्यापेक्षा, रस्त्यावर पाणी मारून वाहनचालकांप्रती काळजी दाखवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा काँक्रीटीकरणाच्या कामाला वेग आणावा, खोदाई केलेल्या भागात पक्के काँक्रीटीकरण करून एक मार्गिका तत्काळ सुरू करावी अशी मागणी संतप्त वाहनचालक व प्रवासीवर्गाकडून केली जात आहे.