(रत्नागिरी) वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर डॉक्टरांची कमतरता दूर होईल अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात तसे घडले नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञ नसल्याने अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. त्यामुळे हे रुग्णालय तसेच तालुक्याचे आणि जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी भूलतज्ज्ञांच्या शोधात आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, अशा प्रतिक्रिया रुग्णांकडून दिल्या जात आहेत.

काहीच दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय सेवेतील अनेक अडचणी दूर होतील अशी आशा नागरिकांना होती. परंतु ती अशा फोल ठरली आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने अनेक शस्त्रक्रिया रखडत

आहेत. काही वेळा स्थानिक पातळीवर अन्य भूलतज्ज्ञ यांना पाचारण करावे लागत आहे. तसेच जिल्हा महिला रुग्णालय अधीक्षकपदी असणारे डॉक्टर विकास कुंबरे यांच्या पदाला मान्यता न मिळाल्याने त्यांना वीस महिन्याचे वेतन मिळालेले नव्हते. त्यामुळे तेही आता राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या रुग्णांना

मोफत उपचार मिळत असल्याने अनेक रुग्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येत असतात. त्या सर्वांना उपचार करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भासते. यामध्ये प्रामुख्याने शस्त्रक्रिया विभागातील भूलतज्ज्ञ नसल्याने अनेक शस्त्रक्रिया रखडतात. याकडे संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.