गेवराई - दि ११ (प्रतिनिधी ) -तालुक्यातील मालेगाव येथील रहिवासी आणि आर बी अट्टल महाविद्यालयाची विद्यार्थीनी साक्षी संजय बने हिची महाराष्ट्राची तयार होणारी फुटबॉल टीमच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे . १२ ते २८ ऑगस्ट दरम्यान मुंबई येथे आयोजित राज्य संघ निवड प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने ती रवाना झाली आहे. पालघर येथे नुकत्याच महाराष्ट्र राज्य फुटबॉल असोसिएशनच्या राज्य स्तर खुल्या महिला फुटबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत बीड सह राज्यभरातील महिलांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेतून गेवराई येथील आर बी अट्टल महाविद्यालयाची फूटबॉलपटू साक्षी संजय बने हिची मुंबई येथे होणाऱ्या राज्य संघ निवड प्रशिक्षण शिबीरासाठी निवड झाली असून ती रवाना झाली आहे. शारदा स्पोर्टस् अकॅडमी व जिल्हा फुटबाल असोसिएशनच्या वतीने तिने सहभाग घेतला होता.

शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक तथा बीड जिल्हा फुटबॉल असो.अध्यक्ष

अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू तथा प्रशिक्षक नविद मशायक यांचे साक्षीला प्रशिक्षण मिळाले होते. गेवराई तालुक्याच्या ग्रामीण भागातील ही खेळाडू भविष्यात भारताच्या संघात दिसेल याचा विश्वास नविद मशायक यांनी व्यक्त केला. आर बी अट्टल कॉलेजच्या मैदानावर साक्षीला विशेष मार्गदर्शन क्रीडातज्ज्ञ रणवीरराजे पंडित , प्रा रविंद्र खरात यांचे विशेष मार्गदर्शन मिळत आहे. मुंबई येथील प्रशिक्षणानंतर साक्षी हिची राज्य संघात निश्चितच निवड होईल असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला. शारदा प्रतिष्ठान ग्रामीण भागातील खेळाडूच्या पाठिशी सदैव सर्वप्रकारे राहील, अशी ग्वाही माजी आ अमरसिंह पंडित यांनी दिली.या यशाबद्दल बीड जिल्हा फुटबॉल असो.चे अध्यक्ष माजी आ. अमरसिंह पंडित, सचिव प्रा .एल .आर .धुमाळ, सहसचिव प्रा सुनिल धांडे, प्राचार्य डॉ. रजनी शिखरे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. सचिन पगारे, क्रीडा स्पर्धा संयोजक प्रा. राजेंद्र बरकसे, डॉ. शंकर धांडे, जिल्हा फुटबॉल असो.च्या स्पर्धा समितीचे प्रमुख नविद मशायक, नगरसेवक मोमीन मोसीन, मुन्ना इनामदार,शिनुभाऊ बेद्रे आदींनी साक्षी बने हिचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.