बीड जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी कापूस वेचून घरामध्ये ठेवलेला आहे. कापसाला योग्य भाव नसल्यामुळे शेतकरी कापूस विकत नाहीत. मात्र काही ठिकाणी कापसावरही चोरटे डल्ला मारू लागले आहेत. घरातील 24 भोत कापूस चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पिंपरखेड येथे घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय राजाराम साबळे (रा. पिंपरखेड) यांनी आपल्या शेतातील कापूस घरामध्ये ठेवला होता. अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा उचलून 24 भोत कापूस चोरून नेला. आपल्या घरातील कापूस चोरीला गेल्याचे साबळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कापसाची एकूण किंमत 67 हजार 200 रुपये इतकी होती. दरम्यान नगदी रकमेसह सोन्याचे दागिने चोरटे चोरून नेतात. आता कापूसही चोरटे चोरून नेऊ लागले आहेत.
 
  
  
  
   
   
  