बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस येताच शेतकऱ्याची आत्महत्या

"पैठण तालुक्यातील कुतूबखेडा येथील धक्कादायक घटना" 

पाचोड (विजय चिडे) बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आल्याने कुतुबखेडा ता.पैठण येथील ४३ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.१०)रोजी रात्री आठवाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. यंदा दुष्काळ जनपरिस्थिती निर्माण झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याने अडचणीत असतानाच, बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आल्याने या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. नारायण भाऊसाहेब करंगळ (वय ४३) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. करंगळ त्यांना बँकेची नोटीस आल्यामुळेच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे

याविषयी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुतुबखेडा ता.पैठण येथील शेतकरी नारायण भाऊसाहेब करंगळ पेरणीसाठी पैठणच्या बँक ऑफ बडोदा बँकेकडून ४ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र आज नारायण करंगळ यांना हे कर्ज व्याजासह ७ लाख ११ हजार ९४० रूपये भरण्याची नोटीस बँकेनी बजावली आहे. करंगळ यांना यावर्षी चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा होती. मात्र पैठण तालुक्यात खरिपाच्या वेळी दुष्काळ पडला तर रब्बीच्या वेळी अतिवृष्टीचा फटका बसला असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीमुळे लावलेला पैसेही निघणे अवघड असल्याची परिस्थिती आहे. त्यात घरातील सर्व जबाबदारी नारायण यांच्यावर असल्याने ते सतत चिंतेत असायचे. दरम्यान बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आल्याने त्यांची चिंता आणखीनच वाढली होती. मुलांचे शिक्षण, त्यात घर चावण्यासाठी लागणार पैसा कुठ्न आणणार याची चिंता त्यांना सतावत होती. बँकेकडून आलेल्या नोटीस मध्ये ९ डिसेंबर रोजी सकाळी कोर्टामध्ये तडजोड करण्यासाठी यावे अन्यथा तुमच्या वरती कारवाई करण्यात येईल असा उल्लेख करण्यात आला होता. शनिवारी कर्जाची तडजोडीसाठी जवळ पैसे नसलेले जाणे शक्य झाले नाही, आता बँकेचे अधिकारी आपल्याला पैसे भरला तकदा लावतील या विवंचनेतून त्यांनी रविवारी शेतामध्ये जाऊन विषारी औषध प्राशन केले, सायंकाळी नारायण करंगळ हे शेतातून घरी आल्यानंतर त्यांनी शेतातच विष प्राशन केल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती नातेवाइकांना दिली असता त्यांनी, ताबडतोब नारायण करंगळ यांना खाजगी वाहनांच्या मदतीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.बाबासाहेब घुगे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यांमध्ये करण्यात आली असून पुढील सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली वीट जमादार गोविंद राऊत हे करत आहेत.