शिरुर - भारतीय संविधनातील विविध मूल्याचा अभ्यास करून ही मुल्ये युवकांनी आत्मसात करावीत असे आवाहन चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ. के.सी.मोहिते यांनी केले. भारतीय संविधानदिनानिमित्त यशवंतरावचव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र बोरा महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीयसेवा योजना यांचा वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्र संयोजक प्रा. डॉ. अंबादास केत, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.पी.कांबळे व प्रा.टोणगे, विद्यार्थी कल्याण समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ.अजित चंदनशिवे, प्रा.डॉ.प्रभुणे,प्रा.डॉ. भोईटे, प्रा.डॉ. मनीषा पाटील, प्रा. डॉ.बेळ्ळे, प्रा. डॉ.दिवटे केंद्र सहाय्यक निळोबा भोगावडे, आदी उपस्थित होते. यावेळी मोहिते म्हणाले की आपल्या हक्का बरोबरच आपल्या कर्तव्याचे पालन करा. आपल्या मुळे इतरांचे नुकसान होणार नाही त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. सामाजिक सलोख्या व सौहार्द टिकवणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. विज्ञान माहित असणे व वैज्ञानिक दृष्टीकोन असणे या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोन महत्वाचा आहे. विज्ञान व संशोधनांचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे असे सांगून ते म्हणाले की प्रश्न विचारण्याचा हक्क आपणांस संविधानाने दिला असून जेथे चुकीचे अयोग्य घडत असेत तिथे प्रश्न विचारले गेले पाहिजेत. भारतीय संविधान व वैज्ञानिक दृष्टीकोन यावर मोहिते यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र संयोजक प्रा. डॉ. अंबादास केत यांनी केले. प्रा. सतीश धुमाळ, साक्षी मिद्गुले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. आभार प्रा.डॉ. अजित चंदनशिवे यांनी मानले. यावेळी भारतीय राज्यघटनेचे उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.