“घरोघरी तिरंगा” व स्वराज्य महोत्सवानिमित्त जालना शहरात भव्य रॅली संपन्न

रॅलीत 200 शाळांतील 75 हजार विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग

“घरोघरी तिरंगा”, भारत माता की जय, वंदे मातरम घोषणांनी शहरातील परिसर दणाणला

जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा

-- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

   जालना, - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “घरोघरी तिरंगा” व स्वराज्य महोत्सवानिमित्त जालना शहरामध्ये 200 प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील 75 हजार विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या उत्स्फूर्त सहभागाने आज सकाळी रॅली संपन्न झाली. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थींनीच्या “घरोघरी तिरंगा”, भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

        भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त “घरोघरी तिरंगा” व स्वराज्य महोत्सवानिमित्त संपुर्ण जिल्ह्याभरात जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन जालना शहरामध्ये विद्यार्थी, विद्यार्थींनीचा सहभाग असलेल्या रॅलीचे आज आयोजन करण्यात आले होते. 

        या रॅलीस जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी बी. आर. खरात, गटशिक्षणाधिकारी श्रीमती गीता नाकाडे, यांच्यासह अधिकारी, शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

        देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान यानिमित्ताने जपला जाणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या प्रत्येकाची आठवण ठेवणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असून आजच्या पिढीला त्यांचे महात्म्य, त्यांचे कार्य आणि विचार समजणे यासाठी “घरोघरी तिरंगा” अभियान राबविण्यात येत असुन जालना जिल्ह्यातील जनतेने या उपक्रमात सहभाग नोंदवून आपल्या घरावर दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी केले.

       जालना शहरातील अंबड चौफुली, गांधी चमन, मोतीबाग, मामा चौक, भोकरदन नाका, मंठा चौफुली, जेईएस महाविद्यालय परिसर या सह सुमारे 200 शाळा महाविद्यालयातील 75 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी ,मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी या भव्य रॅलीमध्ये सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगी झेंडे, विविध बॅनर तसेच रंगीबेरंगी वेशभूषा करत “घरोघरी तिरंगा”, भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा देत शहरातील सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. 

        प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत फित कापून या भव्य अशा रॅलीचा शुभारंभ केला. 

       रॅलीच्या मार्गावर शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज राजगुरू यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी तसेच एनसीसी, स्काऊट गाईड यांचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. 

          स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त “घरोघरी तिरंगा” व स्वराज्य महोत्सवानिमित्त जालना जिल्ह्यातील सर्व तालुका ठिकाणी व गावा-गावामध्ये अशाच पद्धतीने जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.