अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार , पाचोड - पैठण रस्त्यावरील घटना

पाचोड //

पाचोडहून आपल्या दुचाकीने घरी जाणाऱ्या तरुणांस पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना पाचोड - पैठण रस्त्यावर लिंबगाव (ता. पैठण) शिवारात सोमवारी (ता. ३१) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

      यासंबंधी अधिक माहिती अशी, रामेश्वर बाबासाहेब सोहळे (वय वर्ष ३८) रा.खंडाळा (ता.पैठण) हा तरुण पाचोड येथील आपले काम आटोपून दुचाकी (क्रमांक - एम एच २० एल -७१७४) ने आपल्या गावी खंडाळा येथे जात होता. तो छत्रपती जिनिंग प्रेसिंगजवळ येताच पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यास जोराची धडक दिली. यांत त्याला गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला. सदर वाहन चालकाने अंधाराचा फायदा घेऊन कोणतीही कल्पना न देता , मदत न करता घटनास्थळाहून पळून जाण्यात धन्यता मानली. रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूनी हा अपघात पाहून पाचोड पोलिसांना माहीती दिली. माहीती मिळताच पाचोडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने हे त्यांच्या सहकार्‍यासमवेत घटनास्थळी पोहचले व त्यांनी स्वतः घटनास्थळी पडलेला मृतदेह वाहनाद्वारे पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे यांनी त्यास तपासून मृत घोषित केला.

याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास जमादार गोविंद राऊत ,अफसर बागवान करीत आहे .