समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन करत असतांना नागरिकांना चांगल्या सेवा-सुविधा पुरविण्यासाठी नवनवीन उपक्रमांचे आयोजन वाशिम पोलीस दलातर्फे करण्यात येत असते. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करून पोलीस - जनता सलोखा जोपासला जातो. त्याच पार्श्वभूमीवर मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२५ जुलै, २०२३ रोजी सर्व पोलीस उपविभागीय कार्यालये व पोलीस स्टेशन स्तरावर ‘तक्रार निवारण शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. नागरिकांना त्यांच्या तक्रारीसाठी कार्यालयात किंवा पोलीस स्टेशनला सतत चकरा माराव्या लागू नये व त्यांच्या अडचणींवर तोडगा काढून त्यांच्या तक्रारींचे निवारण व्हावे या हेतूने सदर शिबीर आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ०३ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये व १३ पोलीस स्टेशन स्तरावर आयोजित तक्रार निवारण शिबिरास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

सदर तक्रार निवारण शिबिराअंतर्गत वाशिम जिल्हा पोलीस घटकातील सर्व उपविभाग व पो.स्टे.स्तरावरील स्थानिक तक्रारी, वरिष्ठ अर्ज तक्रारी व पी.जी. पोर्टलवरील एकूण ८४ तक्रारींचे निवारण करण्यात आले. सदर शिबिरामध्ये वाशिम उपविभागात ३८ प्रकरणे, मंगरूळपीर उपविभागात २२ प्रकरणे तर कारंजा उपविभागात एकूण २४ प्रकरणे निकाली निघालीत. सदर शिबिराकरिता मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम श्री.सुनीलकुमार पुजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरूळपीर, श्रीमती नीलिमा आरज, उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा श्री.जगदीश पांडे, सर्व पो.स्टे.प्रभारी अधिकारी व तक्रार अर्ज शाखा प्रभारी सपोनि.भारत लसंते यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

‘नागरिकांनी त्यांच्या तक्रारी/अडचणींच्या निवारणासाठी स्थानिक पोलीस स्टेशनला भेट द्यावी व संबधित पोलीस अधिकारी/अंमलदार यांचेकडे आपली अडचण मांडवी. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल कटिबद्ध असून नागरिकांनी आपल्या तक्रारी रीतसर नोंदवाव्यात.’_ असे आवाहन मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी जनतेस केले आहे.