गजानन गव्हाणे पाटील :-

               श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित - न्यू इंग्लिश स्कूल, चणेरे, ता. रोहा (रायगड) शैक्षणिक संस्कृती केंद्रात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक, संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा 35 वा स्मृतिदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेसह विद्यार्थ्यांची प्रभातफेरी न्यू इंग्लिश स्कूल, चणेरे विद्यालयातून-चणेरे गावात काढण्यात आली.

       या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे व युवकांचे प्रेरणास्थान, राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष कासारे शेठ (स्थानिक सल्लागार समिती सदस्य) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाळाराम भोईर (स्थानिक सल्लागार समिती सदस्य) व सारसोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच लक्ष्मण वाघमारे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून अभिवादन करण्यात आले.

          डॉ.बापूजी साळुंखे स्मृतिदिन सोहळा प्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे करून बापूजींना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कासारे शेठ यांनी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. बाळाराम भोईर यांनी बापूजींचे त्यागमय जीवन हजारो कार्यकर्ते यांना स्फूर्ती व ऊर्जा देणारे आहे अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगत व्यक्त करताना गणेश नांगरे यांनी 'संघर्षानेच महान कार्य होतात' असा दाखला देऊन बापूजींच्या स्मृतीस उजाळा दिला. 

           विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. के. जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर सेवक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक व्ही. आर. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन गोपाल टारपे यांनी तर प्रकाश बागुल यांनी आभार मानले.