शिरुर तालुक्यात महिलेची हेलिकॉप्टर साठी अनुदानाची मागणी
( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिरुर तालुक्यातील तहसील कार्यालय नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेत येत असताना नुकतेच शिरुर तालुक्यातील एका महिलेच्या शेतात जाण्यासाठी असलेली रस्त्याची समस्या तहसील कार्यालयाकडून सुटत नसल्याने अखेर महिलेने तहसीलदार यांच्याकडे शेतातील शेतमाल बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी शासकीय मदत व अनुदान देण्याची मागणी केली आहे.
निमोणे ता. शिरुर येथील शेतकरी लताबाई भास्कर हिंगे यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी डिसेंबर २०२२ मध्ये शिरुर तहसिल कार्यालयात रस्ता मागणीचा अर्ज करत रस्त्याची मागणी केली होती, त्यांनतर तत्कालीन तहसीलदार यांनी याप्रकरणी सुनावणी घेऊन संबंधित मंडलाधिकारी यांना स्थळ पाहणी करण्याचे आदेश दिले, मात्र तहसीलदार यांच्या आदेशाला मंडलाधिकारी यांनी केराची टोपली दाखवत तहसीलदारांचे आदेश असून देखील स्थळ पाहणी केली नाही तसेच शेतकरी महिला लताबाई हिंगे या मंडलाधिकारी यांच्या कार्यालयात गेल्या असता त्यांना मंडलाधिकारी भेटले नाही, काही दिवसांनंतर मंडलाधिकारी हे लताबाई हिंगे यांना भेटले असता त्यांनी मी नव्याने येथे बदली होऊन आलो आहे, सध्या मला वेळ नाही, मी लवकरच स्थळ पाहणी करतो असे सांगून स्थळ पाहणी करण्यास टाळाटाळ केली असून अद्याप देखील रस्त्याबाबत स्थळपाहणी केली नसताना सध्या लताबाई हिंगे यांच्या शेतातील पिक काढणीला आलेले असताना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने मोठ्या कष्टाने शेतात पिकवलेला शेतमाल मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन जायचा कसा असा प्रश्न हिंगे यांना पडला असुन शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने माझ्या शेतातील शेतमाल बाहेर काढण्यासाठी मला हेलिकॉप्टर खरेदी करणे अत्यंत गरजेचे असून मला त्यासाठी हेलिकॉप्टरची आवश्यकता आहे तसेच मला हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी शासकीय अनुदान किंवा शासकीय मदत मिळावी अशी मागणी शिरुर च्या तहसीलदारांकडे अर्ज करत शेतकरी महिला लताबाई हिंगे यांनी केली आहे.