वाजेवाडीच्या आदर्श सरपंचाकडून जन्मदात्या आईसह भावाला मारहाण
( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिरुर तालुक्यात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असल्याने अनेक लहान मोठ्या घटना घडत असून कित्येकदा भावकी सह सख्या भावांमध्ये मोठमोठे वाद होत असताना शिरुर तालुक्यातील वाजेवाडीच्या माजी आदर्श सरपंचासह त्याच्या मुलाने वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून आपल्या जन्मदात्या आईसह सख्ख्या भावाला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशनयेथे वाजेवाडीचे माजी आदर्श सरपंच धर्मराज पोपट वाजे व त्यांचा मुलगा ऋतूराज धर्मराज वाजे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वाजेवाडी ता. शिरुर येथे माजी आदर्श सरपंच धर्मराज वाजे व त्यांच्या सख्खा भाऊ प्रताप वाजे यांची वडिलोपार्जित सतरा एकर जमीन असून दोघे भाऊ निम्मी निम्मी शेतजमीन कसत असून प्रताप यांनी त्यांच्या वाट्याच्या जमिनीत उसाचे पिक घेतलेले असून ५ जुलै रोजी प्रताप हे त्यांचे मित्र संतोष जाधव, प्रकाश वाजे यांच्यासह त्यांची आई व पत्नीसह शेतात गेलेले असताना सदर ठिकाणी धर्मराज वाजे व त्यांचा मुलगा ऋतूराज हे दोघे शेतात आले दरम्यान दोघांनी प्रताप यांना तुम्ही लावलेला ऊस आम्ही तुम्हाला तोडू देणार नाही असे म्हणत शिवीगाळ करुन पुन्हा शेतात आला तर पाय तोडून टाकीन अशी धमकी दिली, यावेळी ऋतूराज याने खोऱ्याच्या दांडक्याने प्रताप यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, यावेळी प्रताप यांचे मित्र संतोष जाधव व प्रकाश वाजे हे ऋतूराज यास मारहाण पासून अडवत असताना माजी आदर्श सरपंच असलेल्या धर्मराज वाजे याने प्रतापची पत्नी सपना व आई सरस्वती वाजे या दोघांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने तसेच लाथाबुक्य्यांनी मारहाण केली, सपना प्रताप वाजे वय ४२ सध्या रा. चंदननगर पुणे मूळ रा. वाजेवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी माजी आदर्श सरपंच धर्मराज पोपट वाजे व ऋतूराज धर्मराज वाजे दोघे रा. वाजेवाडी ता. शिरुर जि. पुणे या बापलेकांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोड क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजीनाश शिंदे हे करत आहे.
आदर्श सरपंचांचा काय आदर्श घ्यायचा ?
वाजेवाडीचे माजी आदर्श सरपंच धर्मराज वाजे यांनी गावातील नागरिकांचे तंटे मिटवून गावातील नागरिकांना न्याय मिळवून देणे गरजेचे असताना जमिनीच्या वादातून ते स्वतःच आपल्या जन्मदात्या बाहत्तर वर्षीय वृद्ध आई सह सख्ख्या भावाला मारहाण करत असतील तर अशा सरपंचांचा नागरिकांनी व गावाने काय आदर्श घ्यायचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.