अपघात रोखण्यासाठी पुणे-नगर महामार्गावर डॉक्टरांनी बसवले ब्लिंकर
तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांना प्राणाला मुकावे लागले असताना नुकतेच काही दिवसांपूर्वी शिक्रापुरातील एका डॉक्टर दांपत्याचा अपघात होऊन महिला डॉक्टरचा मृत्यू झालेला असताना स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेकडून पुणे नगर महामार्गावर ब्लिंकर बसवण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावर वारंवार अपघात होत असताना डॉ. मच्छिंद्र खैरे व डॉ. सोनाली खैरे हे दांपत्य १५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या कार मधून जात असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात डॉ. सोनाली खैरे यांचा मृत्यू होऊन डॉ. मच्छिंद्र खैरे गंभीर जखमी झाले होते, त्यांनतर सदर ठिकाणचे अपघात रोखण्यासाठी स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे यांच्यासह डॉक्टरांच्या टीमने पाहणी केली असता पुणे नगर महामार्गावर वाहनांवरील वेगमर्यादा कमी करण्याचा इशारा देणारे कोणतेही फलक अथवा ब्लिंकर नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेकडून नुकतेच सदर ठिकाणी ब्लिंकर बसवण्यात आले आहे. यावेळी स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे, डॉ. सुहास निकम, डॉ. हिरामण तुरकुंडे, डॉ. प्रितम दरवडे, डॉ. श्रीअनंता परदेशी, डॉ. धनंजय लोंढे, डॉ. राम देवखिळे, डॉ. नितीन शिंगाडे, डॉ. मच्छिंद्र गायकवाड, डॉ. स्वप्नाली लोंढे यांसह आदी उपस्थित होते, दरम्यान याबाबत बोलताना स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करुन सामाजिक बांधिलकी जपणार असल्याचे स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे यांनी सांगितले.