सणसवाडीत आढळलेल्या मृतदेहाचा खुनच

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

 सणसवाडी (ता. शिरूर) येथील पुणे नगर महामार्गावर एक जळालेल्या अवस्थेतील मानवी मृतदेह आढळून आलेला असताना सदर मृतदेहा बाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती मात्र सदर मृतदेह हा इसमाचा खून करून मृतदेह जाळून टाकल्याची माहिती समोर आल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                           सणसवाडी (ता. शिरूर) एक जून रोजी पुणे नगर महामार्गावर मानवी व्यक्तीचा एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळून आला होता, मात्र सदर मृतदेह पुरुषाचा की महिलेचा हे समजू शकत नव्हते, दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन साठी पाठवत याबाबत आकस्मृत मृत्यूची नोंद केली होती, मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर सदर मृतदेह पुरुषाचा असून त्याच्या तोंडावर, गळ्यावर मारहाणीच्या खूना तसेच सदर व्यक्तीचा डावा हात व एक पाय मोडलेला असल्याचे समोर आल्याने सदर अज्ञात व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह कोणत्यातरी ज्वलनशील पदार्थाच्या माध्यमातून जाळून टाकल्याचे पोलिसांच्या तपास व शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाल्याने याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल अनिल खटावकर (वय ३३ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून सदर पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.