तळेगाव ढमढेरे परिसरात धुमाकूळ घालणारा दुसरा बिबट्या जेरबंद

आकाश भोरडे

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:  

तळेगाव ढमढेरे व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाळीव प्राणी व दुचाकी स्वारांवर हल्ले करत धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते. त्यानंतर परिसरात दुसऱ्या बिबट्याचाही वावर होता अखेर आज दुसऱ्या बिबट्यालाही पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे . 

तळेगाव ढमढेरे येथील चौधरी वस्ती, ढमढेरे वस्ती, भिमाशेत, मुळेवाडी, टाकळी भिमा, साळूमाळी वस्ती, परिसरात बिबट्याचा मुक्तवावर नागरिकांना पाहायला मिळाला होता. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी स्वारावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. तसेच शेतकऱ्याच्या घराजवळ फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्या बिबट्याला जेरबंद केल्यानंतर परिसरात दुसऱ्या बिबट्याने ही पाळीव प्राण्यावर हल्ला केला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये बिबट्याची प्रचंड घबराट निर्माण झाली होती. हा बिबट्या पायाने लंगडा असल्याचे नागरिकांना दिसले होते. बिबट्याचे परिसरात पाळीव प्राण्यांवरील व माणसावरील हल्ले वाढल्याने वनविभागाच्या वतीने पुन्हा पिंजरा लावण्यात आला होता. आज अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.