सणसवाडीत हुंड्याच्या पैशाच्या वादातून एकाचा खून

सात जणांवर परस्परविरोधी गुन्हे, एकाचा खून एक गंभीर

( शिक्रापूर प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरुर येथे हुंड्याच्या पैशाच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलेली असताना झालेल्या मारहाणीत देवा रमेश भोसले याचा मृत्यू होऊन मयूर उर्फ बाब्या सुधाकर काळे हा गंभीर जखमी झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मयूर उर्फ बाब्या सुधाकर काळे, रशिध कुंजीर भोसले, राहुल उर्फ मोदील कुंजीर भोसले, आकाश सुधाकर काळे, पप्पू रमेश भोसले, देवा रमेश भोसले, जयंतास रमेश भोसले यांच्या विरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                          सणसवाडी येथील पप्पू भोसले याच्या बहिणीचे लग्न तीन वर्षापूर्वी तळेगाव ढमढेरे येथील मयूर काळे याच्या सोबत झालेले असताना त्यांच्या समाजातील प्रथेप्रमाणे मयूर याने मुलीच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते मात्र तीन वर्षात मयूर याने फक्त ऐंशी हजार रुपये दिलेले होते त्यामुळे त्यांच्यात वाद होत होता, १५ मे रोजी देखील सायंकाळच्या सुमारास मयूर काळे व आकाश काळे यांचा पप्पू भोसले याच्या सोबत वाद झाला त्यावेळी त्यांनी आज तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देऊन निघून गेले, त्यांनतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मयूर काळे त्याच्या तीन साथीदारांसह भोसले यांच्या घरी आला त्यावेळी त्यांच्यात लाकडी दांडके, खोरे, दगडांनी तुफान हाणामारी झाली, दरम्यान मयूर भोसले व त्याच्या साथीदारांनी केलेल्या मारहाणीत देवा रमेश भोसले रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे याचा जागीच मृत्यू झाला तर पप्पू भोसले व त्याच्या दोघा भावांनी केलेल्या मारहाणीत मयूर उर्फ बाब्या सुधाकर काळे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे हा गंभीर जखमी झाला असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे, घडलेल्या घटनेबाबत पप्पू रमेश भोसले वय २५ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे व नंदिनी मयूर काळे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मयूर उर्फ बाब्या सुधाकर काळे व आकाश सुधाकर काळे दोघे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे, रशिध कुंजीर भोसले व राहुल उर्फ मोदील कुंजीर भोसले दोघे रा. पाठेठाण ता. दौंड जि. पुणे, पप्पू रमेश भोसले, देवा रमेश भोसले, जयंतास रमेश भोसले तिघे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व नितीन अतकरे हे करत आहे.