शिरुर दिनांक ( वार्ताहर) ज्येष्ठ शिक्षणतज्ञ माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांच्या जीवनकार्याचा समावेश असणारा धडा विद्यार्थ्यासाठी असावा अशी सूचना माजी आमदार काकासाहेब पलांडे यांनी केली. येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र बोरा महाविद्यालय व शहरातील विविध संस्था संघटना यांच्या वतीने माजी कुलगुरू विचारवंत डॉ. राम ताकवले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार सुर्यकांत उर्फ काकासाहेब पलांडे, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. सुभाष पवार, आदी उपस्थित होते. पलांडे म्हणाले की डॉ. ताकवले हे काळानुरूप शिक्षण, संशोधनासंदर्भातील शिक्षण याबाबत आग्रही होते. संस्कारांची,विचारांची पेरणी समाजात त्यांनी केली.अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांसाठी डॉ.राम ताकवले यांच्या जीवनकार्याचा समावेश असणारा धडाचा समावेश करावा अशी सूचना त्यांनी केली. सचिव नंदकुमार निकम म्हणाले की डॉ.ताकवले हे सर्व समाजाचे शिक्षक होते. उत्तम ते साध्य करण्याचा त्याचा ध्यास असायचा. मुक्त विद्यापीठाद्वारे डॉ. ताकवले यांनी शिक्षण व ज्ञान हे घरोघरी पोहचविले. विज्ञान,साहित्य, भाषा सह समाजशास्त्र अश्या सर्वच विषयाच्या व्यासंग त्याच्या होता ते दूरदृष्टीचा विचार करणारे शिक्षणतज्ञ होते. डॉ. ताकवले यांचे विचार पुढे नेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून बोरा महाविद्यालयात त्याच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे निकम म्हणाले. प्राचार्य डॉ. के.सी.मोहिते यांनी सांगितले की माझे ते शिक्षक होते. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक व सतत नवीन शिकण्यासाठी त्यांची धडपड असायची. ताकवले सरांच्या विविध आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या. शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती अॅड.प्रदीप बारवकर यांनी डॉ. राम ताकवले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यानमाला आयोजित करण्याची सूचना केली. शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड .सुभाष पवार, प्रा.सतीश धुमाळ,डॉ.मंदा काणे, शिरूर मुद्रक संघटनेचे अध्यक्ष बाबुराव पाचंगे, आदींनी ही यावेळी श्रद्धांजली अपर्ण केली. प्रास्ताविक प्रा.चंद्रकांत धापटे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.अंबादास केत यांनी केले. आभार प्रा. हरिदास जाधव यांनी मानले. फोटो ओळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. राम ताकवले यांना शिरूर येथे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.