शिरुर तालुक्यात बनावट व्यक्तीने विकली चक्क जमीन
शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल
( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिरुर तालुक्यातील एका व्यक्तीच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून जमिनीचा मी मालक आहे असे भासवून एका व्यक्तीची जमीन चक्क खरेदीखताने विक्री केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिरुर तालुक्यातील एका ठिकाणी यशवंत पटेल यांच्या मालकीची जमीन असून त्यांच्या नावाने एका व्यक्तीने बनावट ओळखपत्र बनवून सदर जमिनीचा मालक मी आहे असे भासवून त्या जमिनीची २४ फेब्रुवारी २०२३ रोजी तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदीखताने विक्री देखील केली, त्यांनतर यशवंत पटेल यांच्या शेजारील व्यक्तीने पटेल यांच्याशी चर्चा करताना जमिनीची विक्री करायची होती तर आम्ही घेतली असते असे म्हटल्याने पटेल चक्रावून गेले आणी त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातून कागदपत्रे मिळवून कागद पत्रांची तपासणी केली असताना अज्ञात व्यक्तीने यशवंत पटेल यांच्या नावाचे बनावट ओळखपत्र बनवून जमिनीची विक्री करुन पटेल यांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत यशवंत देवराम पटेल वय ६७ वर्षे रा. बिबवेवाडी कोंढवा पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी यशवंत पटेल नावाच्या बनावट अज्ञात इसमावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर व पोलीस हवालदार सचिन होळकर हे करत आहे.