बहुआयामी व्यक्तिमत्त्व : प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित*
महाराष्ट्राला यशस्वी प्राचार्यांची दीर्घ अशी मोठी परंपरा आहे. त्यामध्ये प्राचार्य राम शेवाळकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य गजमल माळी, प्राचार्य रा. र. बोराडे, प्राचार्य ना. य. डोळे, प्राचार्य द. रा. कुलकर्णी, प्राचार्य गंगाधर पाथरीकर, प्राचार्य छाया महाजन या परंपरेत अनेक उल्लेखनीय नावे सांगता येतील. असेच एक नाव छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वसुधा पुरोहित यांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त प्राप्त आहे. त्यांनी आपले अर्थशास्त्र या विषयात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर त्या प्राचार्य झाल्या. तेव्हापासून त्यांनी महाविद्यालयात यशस्वीपणे योगदान दिले आहे.
इतरांच्या भविष्याची वाट सोपी, समृध्द करणारी माणसे समाजाच्या उन्नत व निर्धास्तपणाची हमी असते. अशी माणसं आपल्याला लाभणे, त्यांच्या सहवासात काम करणं हा एक आर्शिवादाचाच भाग समजला पाहिजे.या माणसांमुळेच आपल्यातला संकुचितपणा घालवला जातो, व्यापकता येते आणि जीवनात अंधार दूर जाऊन प्रकाश पेरणी होत जाते..
शांत, संयमी, हसतमुख व्यक्तिमत्व, विद्यार्थीप्रिय, शिक्षक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या लाडक्या प्राचार्या आदरणीय डॉ. वसुधा पुरोहित या दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी डॉ.सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयातून प्राचार्य या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवा गौरव निमित्त हा लेख.
कर्तुत्व , प्रतिभा, मूल्यनिष्ठा, गुणवत्ता व वर्तणूक या लपणाऱ्या गोष्टी नक्कीच नाहीत त्याची दखल नेहमीच घेतली जात असते. असेच एक दखलपात्र आदर व अभिमानाचा विषय असलेले व्यक्तिमत्व डॉ वसुधा पुरोहित.
बदलत्या काळानुसार विद्यार्थी घडावेत यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध ख्यातनाम वक्ते, लेखक, अभ्यासक, विचारवंत, कलाकार यांना बोलावून विद्यार्थी व प्राध्यापकांना एक वैचारिक मेजवानी त्या उपलब्ध करून देत असत.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने प्रसिद्ध अशा कलाकारांना बोलावून महाविद्यालयातील कलाकारांना खूप मोठी संधी त्या उपलब्ध करून देत असत.
महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आजी -माजी विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, कार्यालयीन स्टाफ तसेच संस्थेचे पदाधिकारी यांना बोलावून विविध उपक्रम, कार्यक्रमांनी उत्साहात साजरे केले.
महाविद्यालयाचा भौतिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक गुणवत्तापूर्ण विकास होण्यास गती मिळाली.
प्राचार्य म्हटले कि विविध भूमिकांमधून जावे लागते. प्रसंगानुरूप भूमिकाबाबतचा संयम सांभाळणे अनेकांना अवघड जाते. मॅडमनी मात्र आपल्या संस्कार, अभ्यास आणि जीवनानुभवातून सांभाळला आहे. नाहीतर माणसांना नशेसारख्याच भूमिका चढत असतात. त्यांना लोकप्रियताही कधी चढल्याचे कोणाला निदर्शनास आले नाही. आक्रमक होणे हा त्यांचा स्वभाव नाही. ठामपणा हा मात्र त्यांचा स्वभाव होता. या ठामपणाला प्रसन्नतेची जोड होती. ठामपणाचा संबंध विचाराशी राहिला आहे. अंहपणाशी नाही.
मॅडम जेवढ्या साध्या दिसतात तेवढ्याच साधेपणाने बोलतात. तरीही त्यांचे बोलणे मात्र प्रभावी आहे. साधेपणा आता दुर्मिळ होत जाणार्या या काळात त्यांच्या साध्या व सहजपणात निखळ माणुसकीचा साक्षात्कार होतो.
समोरच्या व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणांची पारख करून त्याला त्याची जाणीव करून देऊन, प्रोत्साहन देऊन महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी उपयोग कसा होईल? याच दृष्टिकोनातून विचार केला आहे.
त्या नेहमी म्हणतात कि, चांगले संस्कार -विचार, चांगली वर्तणूक, चांगल्या कामाची नेहमी दखल घेतली जाते.
प्राचार्यांकडे कमालीचा संयम पाहायला मिळतो. कोणीही कितीही तक्रार करो, नाराजी व्यक्त करो, चुका करो, त्रास देवो, वाद होवो तरीही त्या चिडणार नाहीत, रागावणार नाहीत. समोरचा व्यक्ती मॅडम शांतपणे
संपूर्ण ऐकुन घेत असल्याचे पाहून आपण जिकंल्याचे समाधान घेऊन परतही जात असे. त्याच्याशी संवाद साधतील. प्रेमाने, अगदी मनापासून गोडही बोलतील. अशावेळी आपल्या विचाराच्या/ म्हणण्याच्या स्वीकाराबरोबर विजयाचे समाधान त्याला मिळवून दिल्याचा संतोष. ही प्राचार्या पुरोहित मॅडम जमेचीच बाजू म्हणावी लागेल.
त्यांना मतभेद मान्य, पण मतभेद करणार्या माणसाचा दुरावा अमान्य. व्यक्तिगत आकस नाही. ज्याचे त्याचे दोष त्याच्यापाशी, आपल्याला चांगले गुणच महत्वाचे वाटले पाहिजे. हा उपदेश त्यांचा महत्वपूर्ण वाटतो.
त्यांना महाविद्यालयीन जीवनापासून अर्थशास्त्र याविषयाची विशेष आवड व लेखन. यासोबतच त्यांनी शिक्षण, साहित्य, संस्कृती,कला, नाट्य, इतिहास, संगीत, क्रीडा, योग इत्यादींची आवड जोपासली आहे. त्यांचा ज्ञान आणि व्यवहार याची सांगड घालण्याचा प्रयत्न खरंच वाखनण्याजोगा आहे.
महाविद्यालयाचा वार्षिकांक शब्दश्री कडे त्या विशेष लक्ष देऊन दर्जेदार अंक निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करत असत.
त्यांचा प्राचार्य पदाचा कालावधी सर्वांसाठी अगदी सुखकारक- आनंददायी, प्रेरणादायी, विकासात्मक राहिला आहे. एवढेच नाही तर महाविद्यालयाच्या विकासात आणि उन्नतीत त्यांचा मोलाची भर टाकणारा राहिला आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थी घडली-घडवली आहेत. महाविद्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यास त्यांचा सहवास हवाहवासा वाटत असतो. त्यांची प्रशासन बद्दलची जाण उत्तम आहे व माहीत नसेल तर ते जाणून घेण्याची इच्छा आणि त्यातून योग्य तो मार्ग काढून कर्मचाऱ्यांच्या आणि महाविद्यालयाच्या हिताचे व विद्यार्थी केंद्रीत कामकाज असे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे अंकुर जपत, फुलवत,वाढवत त्यासाठी ध्यास आणि प्रयत्न असतो.
दरवर्षी गरीब, होतकरू, हुशार विद्यार्थ्यांची फीस स्वतः भरत असत. त्यांना सर्वोतोपरी मदत करत असत. कायम विद्यार्थी केंद्रीत निर्णय त्या घेत असत, हे विशेष.
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तसेच शिक्षण हे माणसाच जगणं सुंदर करुन घेण्याची प्रक्रिया आहे. संस्था, पालक, शिक्षक, विद्यार्थी, तसेच विद्यापीठ, सरकारी शिक्षण विभाग यांच्यात उत्तम ताळमेळ, समन्वय ठेवावा लागतो. त्यामुळेच डॉ पुरोहित यांनी यासर्व घटकांशी समन्वय ठेवत महाविद्यालयाच्या विकासात अगदी कल्पकतेने योगदान दिले आहे.
त्यांच्या कार्यकाळामध्ये काम करताना कधीही कोणालाही दडपण, टेन्शन येणार नाही . प्रत्येकाला त्यांच्याकडून काम करण्याची प्रेरणा, प्रोत्साहन मिळतो त्या अगदी ज्या विश्वासाने कामाची जबाबदारी एखाद्यावर सोपवतात तोही तेवढ्याच प्रामाणिकपणे व आनंदाने जबाबदारी पार पाडतो.
त्यांना माणसं जोडण्याची आवड आणि समुह भावनेने काम करण्याचा त्यांचा आग्रह आणि होत नसेल तर करुन घेण्याचे उत्तम कौशल्य त्यांच्या अंगी आहे.
काॅलेज म्हटलं विविध कार्यक्रमांची रेलचेल, विद्यार्थ्यांची चहलपहल शिक्षक-कर्मचाऱ्यांची लगबग आलीच.
कुठलाही कार्यक्रम हमखास यशस्वी झालाच पाहिजे. त्यासाठी त्याच्या यशस्वीतेसाठी अगदी बारकाईने सर्व गोष्टीवर नियोजनासह व्यक्तिगत लक्ष देणार, मार्गदर्शन करणारं आणि सफल झाला की संबंधिततांचे तोंड भरून कौतुक करणार यात काही वादच नाही.
महाविद्यालयातील कोणाची अच्युव्हमेंट असली कि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव व त्याचा अभिनंदन, सत्कार आवर्जून केला जात असे.
महाविद्यालयातील प्रत्येकाला त्या कठीण प्रसंगात धीर देतात, मार्ग दाखवतात, अगदी मायेने विचारपूस करणे, काळजी करणे नव्हे तर घेणे आणि सदैव भक्कमपणे पाठीशी उभे राहणे, हे उल्लेखनीय आहे.
जशी पुस्तके वाचली जातात, समजून घेतली जातात अगदी तशीच माणसं वाचणं, समजून घेण्याच कौशल्य त्यांच्या अंगी आहे. त्यांना जोडणं त्यांच्या क्षमतांचा, ऊर्जेचा महाविद्यालयाच्या विकासात उपयोग करुन घेणं हे प्राचार्यांच महत्वाचे वैशिष्ट्य सांगता येईल.
त्यांच्या प्राचार्यपदाचा कार्यकाळ पाहिला व अनुभवला तर आपल्याला , सेलू जिल्हा परभणी येथील नूतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य द. रा. कुलकर्णी यांच्या आदर्श अशा प्राचार्य पदाच्या कार्यकाळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. महाविद्यालयाचा कुटुंबप्रमुख /प्राचार्य कसा असावा ? त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्राचार्य डॉ. वसुधा पूरोहित होत.
शेवटी प्राचार्यांच्या बद्दल सोशल मिडियातून वाचण्यात आलेल्या कवितेचा उल्लेख करावासा वाटतो (कवी माहिती नाहीत)....
*हल्ली मी कुणाशी भांडत नाही,*
*दुःख माझे कुणाकडे मांडत नाही!* *झाल्या वेदना अनावर*
*तरी मनावर मी घेत नाही*,
*चुकला कोणी कितीही*
*दोष त्याला मी देत नाही*
*सोडावा लागेल स्वाभिमान*
*इतकेही मी झुकत नाही*
*जोडावे लागतील हात*
*इतकेही मी कधी चुकत नाही!*
*ओळखता येतो कावा मलाही*
*पण निशाणा मी साधत नाही,*
*वास्तवाशी जुळली नाळ माझी*
*स्वप्नांचे इमले मी बांधत नाही!*
असे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित ह्या आमच्यासाठी प्रेरणादायी, आदरणीय आहेत.त्यांनी शिक्षणक्षेत्रात एक आदर्श घालून दिलाय. याकाळात आपली राहिलेली स्वप्न, इच्छा, छंद पूर्ण करतांना नक्कीच दिसतील. त्यांचा सेवानिवृत्तीनंतरच काळ समाजपयोगी व अत्यंत निरोगी, दीर्घायु, सुखकारक, आनंददायी, जावो हीच मनःपूर्वक सदिच्छा......
प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड
डॉ.सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय, निराला बाजार,छत्रपती संभाजीनगर