विद्यमान ग्रा पं सदस्य जागीच ठार

"धुळे -सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ शिवारातील घटना"

पाचोड//शेतातुन घरी जात असतांना दुचाकी घसरल्याने डोक्याला जबर मार लागून आडूळच्या माजी उपसरपंचचा पती जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी ( दि.१९ ) रोजी राञी ११ वाजेच्या सुमारास धुळे - सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील आडूळ बायपास रस्त्यावर घडली. राहुल नानाराव बनकर ( वय ४५ ) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

आडूळ बु च्या माजी उपसरपंच अलका बनकर यांचे पती तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल बनकर यांच्या मालकीची आडूळ - रजापुर शिवारात शेती असून बुधवारी ( दि.१९ रोजी ) रात्री बनकर व त्यांच्या पत्नीचा भाऊ ( मेव्हुणा ) असे दोघे जण शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते.रात्री ११ वाजेच्या सुमारास राहुल बनकर हे एकटेच त्यांच्या बुलट दुचाकी क्रमांक एम एच २० जी ए ५१६१ ने बायपास मार्गे शेतातून घरी परत येत असतांना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते दुचाकीसह राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुला असलेल्या खोल खड्यात पडले यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठा रक्तस्राव होऊन ते जागीच ठार झाले.या घटनेची माहिती रस्त्याने जाणाऱ्या एका वाहन चालकाने बायपास रस्त्यावरील एका हॉटेल चालकाला दिली यानंतर सदरिल हॉटेल चालकाने उपस्थित ग्रामस्थांना कळविल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन मदतकार्य करुन राहुल बनकर यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविले.शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासुन मृत घोषित केले.सदरिल घटनेची माहिती पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने,पोलीस निरीक्षक सुरेश माळी,रावसाहेब आव्हाड,रणजितसिंग दुल्लत,अफसर बागवान यांना कळताच त्यांनी सुद्धा तत्काळ घटनास्थळी धाव घेवुन पाहणी केली. आज गुरुवारी सकाळी शहरातील शासकीय रुग्णालयात राहुल बनकर यांचे शवविच्छेदन झाल्यावर दुपारच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात आडूळ बु गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.

*दलितांचा नेता हरपला*

येथील दलित समाजातील नागरीकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी असो कि नैसर्गिक आपत्ती असो कोणत्याही क्षणी ते पुढाकार घेवुन त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल बनकर नेहमीच अग्रेसर होते.त्यामुळेच त्यांच्या पत्नी अलका बनकर या दोन वेळेस उपसरपंच पदावर कार्यरत होत्या. तर यंदा दोन्ही पती - पत्नी विद्यमान ग्राम पंचायत सदस्य आहेत. 

*घातपाताच्या शक्यतेची गावात चर्चा*

महामार्गावरून बऱ्याच लांब बुलट दुचाकी जावुन हि दुचाकीला काहीच कसे झाले नाही ? शिवाय राहुल बनकर यांच्या डोक्या व्यतिरिक्त अंगावर अन्य कोठेही मार लागल्याच्या खुना नाही त्यामुळे गावात घातपाताच्या शक्यते विषयी तर्कवितर्क लावले जात आहे. 

*आडूळ १००% कडकडीत बंद*

नेहमीच दिन दुबळ्याची मदत करणारे ग्रा पं सदस्य,सामाजिक कार्यकर्ते राहुल बनकर यांचे बुधवारी रात्री अपघाती निधन झाल्याने आडूळ गावात शोककळा पसरली असुन येथील नागरीकांनी स्वयंस्फूर्त पणे आपापले व्यवहार आज गुरुवारी शंभर टक्के बंद ठेवले होते.