अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे घर भस्मसात
"पैठण तालुक्यातील हिरापुर येथील घटना"
पाचोड //
अचानक लागलेल्या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून भस्मसात झाले असल्याची ही घटना पैठण तालुक्यातील हिरापुर ता.पैठण येथे (दि .४) रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आला आहे.
याविषयी सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार,पैठण तालुक्यातील हिरापुर येथील गणेश आत्माराम थोरात हे आपल्या पत्नी व मुलासह राहत असून गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू असल्याने ते आपल्या कुटुंबासह किर्तन ऐकण्यासाठी गेले होते. अशातच सोमवारी रात्री १०:३०च्या सुमारास गणेश थोरात यांच्या घराला अचानक आग लागली.
आग लागल्याचे लक्षात येताच गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा केला. नागरिकांच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने कोणतीही जिवीतहाणी झाली नाही या आगीत शेतीमालासह संसार उपयोगी साहित्य फॅन, वॉशिंग मशीन, गादी, पलंग, वेडींग मशीन जळून खाक झाल्याने गणेश थोरात यांचे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. थोरात कुटुंबीयांचा संसार उघड्यावर आला आहे. सरपंच विनोद राठोड यांनी घटनेची माहिती
मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन सहकार्य केले. सरपंच विनोद राठोड यांनी एकतुनी सजाचे तलाठी बोंन्द्रे यांना घटनेची माहीती दिली. तलाठी बोन्द्रे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आगीमुळे गरीब कुटुंब रस्त्यावर आले असुन शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी गावातील नागरिकांकडुन केली जात आहे.