अंगणवाडी सेविका गैरहजर असल्याने निलंबित..

"महिला बाल विकास आयुक्तांनी दिली अचानक भेट"

पाचोड (विजय चिडे) पैठण तालुक्यातील थापटी तांडा येथील अंगणवाडीला महिला बालविकास आयुक्त रुबल आग्रावाल यांनी (दि.५) रोजी सकाळी नऊच्या दरम्यान अचानक भेट दिली असता अंगणवाडी सेविका गैरहजर असल्याने तिला तत्काळ कामावरून निलंबित केल्या चा प्रकार घडला आहे. यामुळे पैठण तालुक्यातील संपूर्ण गैरहजर असणाऱ्या अंगणवाडी सेविकांची चांगलीच धावपळ उडाल्याची पहावयास मिळाली.

अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून बालमनावर शैक्षणिक संस्कार रूजविले जातात. प्राथमिक शिक्षणाचा पाया म्हणून अंगणवाडी केंद्रांकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील बालकांना अंगणवाडीतून दर्जेदार शिक्षण मिळावे,केंद्राचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी शासनाकडून अंगणवाडी सेविकांच्या जागा भरण्यात आल्या आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांनी मुख्यालय राहूनच राहण्याचे आदेश देखील शासनाकडून देण्यात आलेले आहे. 

पैठण तालुक्यातील काही अंगणवाडी या आदेशाला हरताळ फासत असल्याचे दिसून आले आहे. महिला बाल विकास आयुक्त रुबल आग्रावाल या छत्रपती संभाजीनगर वरून बीडमध्ये एका महिला मेळाव्यासाठी जात असताना त्यांनी अचानक धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता लागत असणाऱ्या पैठण तालुक्यातील थापटी तांडा येथे ( दि.५) सकाळी नऊ वाजता भेट दिली असता अंगणवाडी केंद्र बंद निघाले. यावेळी त्यांना अंगणवाडी सेविका छाया काळूसाहेब राठोड या अंगणवाडी कार्यालयावर गैरहजर असल्याच्या आढळून आल्या. त्याचबरोबर या ठिकाणी अंगणवाडीत केंद्रात लाभार्थी उपस्थित नव्हत्या त्याचबरोबर अंगणवाडी केंद्रामध्ये आहार आलेला नव्हता, वास्तविकतः अंगणवाडी सेविकेकडून आहार शिजविण्याचे काम असतांना आहार नसणे ही गंभीर बाब आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जात नाही. विनापरवानगी सतत गैरहजर रहाणे. अंगणवाडी सेविकेने अंगणवाडी कार्यक्षेत्रात रहाणे आवश्यक असतांना त्या शहरात रहात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी नेमणूकीच्या अटी व शर्तीचा भंग होत आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सर्व सेवापासून लाभार्थी वंचीत रहात असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वीही त्यांना बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी संबंधितास कारणे दाखवा नोटीस देवूनही कामकाजात कुठलीही सुधारणा झालेली नाही.

त्यामुळे छाया काळूसाहेब राठोड, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी केंद्र थापटी तांडा, प्रकल्प-१ पैठण यांनी अंगणवाडीच्या कामात कर्तव्यात कसूर करून सेवेतील नियुक्तीच्या अटी व शर्तीचा भंग केला आहे. तसेच संदर्भिय शासन निर्णयातील तरतूदीनुसार या आदेशाद्वारे संबंधितास अंगणवाडीच्या मानधनी सेवेतून कमी करण्याचे आदेश तात्काळ महिला बाल विकास आयुक्त अग्रवाल दिले असता अंगणवाडी सेविका राठोड यांना तात्काळ सेवेवरून निलंबित करण्यात आले आहे.